कल्याणच्या बाजारपेठेत गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेली पोलिसांची गस्त पोलीस अधिकारी बदलताच बंद करण्यात आल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलीस गस्त सुरू झाल्यापासून बाजारपेठ भागातील चोऱ्या, लुटमारीचे प्रकार बंद झाले होते. गस्त बंद होताच हे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत, असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.
कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ, स्टेशन रस्ता परिसरात सकाळ ते रात्री उशिरापर्यंत गर्दी असते. या गर्दीचा लाभ उठवून अनेक भुरटे चोर या भागात वावरत असतात. अनेक व्यापारी सकाळी, संध्याकाळी दुकानातील पैशाची पुंजी घेऊन या भागातून ये-जा करतात. अनेक खरेदीदार या भागात साहित्य खरेदीसाठी येतात. त्यांची पैशाची पाकिटे लांबवणे असे प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू होते. व्यापारी, खरेदीदार पैसे पळवल्यानंतर फक्त पोलीस ठाण्यात तक्रार करीत होते. पुढे त्याबाबत कोणतीही कार्यवाही पोलिसांकडून होत नव्हती.
व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राकेश मुथा यांच्या नेतृत्वाखाली हरिश खंडेलवाल, नीलेश जैन, कुमेश करिया, महेश निसार यांच्या शिष्टमंडळाने महात्मा फुले पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक दिनेश कटके यांची भेट घेतली. बाजारपेठ भागात पोलिसांची कायमस्वरूपी बंदोबस्त ठेवण्याची मागणी केली. हा विषय व्यापाऱ्यांनी सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनाही सांगितला. लक्ष्मीनारायण यांनी तातडीने गस्तीची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. भेटीच्या दिवशीच बाजारपेठ विभागातील बारा व्यापाऱ्यांकडे पोलीस हजेरीसाठी नोंदणी वह्य़ा ठेवण्यात आल्या. पोलीस दिवसभरात या व्यापाऱ्यांच्या दुकानात जाऊन आम्ही गस्तीवर आहोत हे दाखवण्यासाठी नोंदणी पुस्तकात सही शिक्यानिशी हजेरी लावू लागले. चार ते पाच दिवस हा प्रकार नियमित सुरू होता. या पाच दिवसांत एकही चोरी बाजारपेठ विभागात सुरू झाली नाही. कटके यांची बदली होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी दत्तात्रय पांढरे आले. ते आल्यानंतर गस्तीचा प्रकार दुसऱ्या दिवसापासून बंद झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर लगेच थंड पडलेल्या चोरांनी पुन्हा उचल खाल्ली. झुंझारराव बाजारातील एका व्यापाऱ्याची दोन लाखांची पिशवी भुरटय़ाने लांबवली आहे.
यासंदर्भात महात्मा फुले पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पांढरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेथील हवालदाराने साहेब बैठकीत व्यस्त असल्याचे सांगितले.