ठाणे आणि डोंबिवली शहरातील कारवाईपाठोपाठ राज्यातील आणखी चार पंपांवर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री धाड टाकल्या असून त्यामध्ये भिवंडीतील दोन तर पुणे आणि खोपोली शहरातील प्रत्येकी एका पंपाचा समावेश आहे. या चारही पंपांवरील पेट्रोल भरणाऱ्या यंत्रामध्ये मायक्रोचीप बसवून त्याद्वारे पेट्रोल चोरी सुरू होती. मात्र, नेमकी किती पेट्रोल चोरी केली जात होती, याबाबत अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, अशाच प्रकारे पेट्रोल चोरी करून ग्राहकांची लूटमार करणारे राज्यातील आणखी काही पंप ठाणे पोलिसांच्या रडारावर आले असून या पंपांवर सोमवार (आज) पासून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे आणि डोंबिवली शहरातील दोन पेट्रोल पंपावर ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी धाड टाकल्या होत्या. या धाडीमध्ये दोन्ही पंपावरील पेट्रोल भरणाऱ्या यंत्रामध्ये मायक्रोचीप बसवून त्याद्वारे ग्राहकांची लुट सुरु असल्याची बाब उघड झाली होती. त्यामुळे या दोन्ही पंपांना पथकाने टाळे ठोकले आहे. या कारवाईमुळे उत्तर प्रदेश राज्यापाठोपाठ महाराष्ट्रातही पेट्रोल चोरीचे लोण पोहचल्याची बाब उघड झाली आहे.

तसेच राज्यातील अशा पेट्रोल पंपांची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली असून त्याआधारे पथकाने शनिवारी रात्री पेट्रोल चोरीप्रकरणी आणखी चार पंपांवर कारवाई केली.

भिवंडीतील दोन तर पुणे आणि खोपोली भागातील प्रत्येकी एका पंपांवर ही कारवाई करण्यात आली. ठाणे आणि डोंबिवलीमध्ये कारवाई करण्यात आलेल्या दोन्ही पंपाप्रमाणेच या चारही ठिकाणी मायक्रोचीपच्या साहाय्याने पेट्रोल चोरी सुरू होती. या चारही पंपावरील पेट्रोल भरणाऱ्या यंत्रामध्ये बसविण्यात आलेली मायक्रोचीप पथकाने जप्त केली आहे. या चीपच्या तपासणीनंतर चारही पंपांवर नेमकी किती पेट्रोल चोरी होत होती, याबाबत स्पष्ट होऊ शकले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

औरंगाबादेतही अचानक तपासणी

देशातील काही पेट्रोलपंपांवरून इंधन वितरण प्रक्रियेमध्ये चालकांकडून ग्राहकांची फसवणूक होत असून ठाण्यामध्ये असे प्रकार उघडकीस आले आहेत. या पाश्र्वभूमीवर औरंगाबाद शहरातील चार पेट्रोलपंपांची अचानक रविवारी तपासणी करण्यात आली.

मायक्रोचीपद्वारे चोरी

ठाणे आणि डोंबिवलीपाठोपाठ पुणे, खोपोली आणि भिवंडीतील चार पेट्रोल पंपांवर शनिवारी रात्री पथकाने कारवाई केली असून या चारही पंपांवरही मायक्रोचीपचा वापर करून पेट्रोल चोरी केली जात होती. तसेच या पंपावरील चीपच्या तपासणीनंतरच नेमकी किती पेट्रोल चोरी केली जात होती, हे स्पष्ट होऊ शकले. अशाच प्रकारे ग्राहकांची लूट करणाऱ्या राज्यातील आणखी काही पंपांची माहिती हाती आली असून या पंपांवर सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.