News Flash

रेती चोरावर गुन्हा, पण नाव ‘चुकविले’

पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्य़ात दिलीप नथुराम भोईर असा वडिलांचा चुकीचा उल्लेख केला आहे

आरोपी सुटण्याची शक्यता; साठय़ाच्या आकडय़ामध्येही ‘गोलमाल’?
महसूल विभागाला अंधारात ठेवून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्याच्या उद्देशाने डोंबिवलीजवळील खाडीतून चोरलेली रेती तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्या निदर्शनास येऊ नये म्हणून खाडी किनाऱ्यापासून दूर असलेल्या डोंबिवलीतील उमेशनगरमधील स्वत:च्या मालकीच्या जागेत लपवून ठेवण्यात आली होती. या चोरीप्रकरणी दिलीप नथुराम भोईर या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या नावात चूक असल्याने आरोपीकडून न्यायालयात ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा घेतला जाऊ शकतो, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
डोंबिवली तलाठी सजेचे मंडळ अधिकारी प्रल्हाद खेडकर यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे अधिनियम १५ अन्वये कलम ४८ (७) व पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल करताना खेडकर यांनी आरोपीचे नाव दिलीप मथुरदास भोईर असे असताना, विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्य़ात दिलीप नथुराम भोईर असा वडिलांचा चुकीचा उल्लेख केला आहे. पोलिसांकडून जेव्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाईल, तेव्हा आरोपीच्या वकिलाकडून नावातील चुकीमुळे हे प्रकरण आमच्याशी संबंधित नाहीच, अशी भूमिका घेतली जाऊ शकते, असे एका तज्ज्ञाने सांगितले.
तसेच, ब्रासमध्ये चोरीची रेती मोठय़ा प्रमाणात असुनही ती तक्रारीत कमी दाखविण्यात आली असल्याचा संशय रेती क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. एक ब्रास रेतीचा दर ९ हजार रुपये आहे. एक डम्परमध्ये तीन ब्रास रेती बसते. रेतीचा डम्पर २७ हजार रुपयांना विकला जातो, अशी लाखो रुपयांची रेती घटनास्थळी आहे.

केवळ ३८ ब्रास रेतीचेच ढिगारे?
पोलीस ठाण्यातील तक्रारीत भोईर यांनी ३८ ब्रास रेती चोरल्याचे म्हटले आहे. तसेच, रेतीचे ढीग उपसण्यासाठीच्या पोकलेनची (क्रेन) किंमत दोन ते तीन लाख रुपये असताना, ती फक्त ६० हजार दाखविण्यात आली आहे. क्रेन सील करण्यात आली आहे. ३८ ब्रास रेतीला १३ लाख ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सगळ्या रेती उपसा प्रकरणाची कल्याण विभागाचे प्रांत आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र पाहणी पथके पाठवून चौकशी करावी, म्हणजे या रेती चोरी प्रकरणातील गौडबंगाल आणखी उघड होईल, अशी चर्चा होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2016 3:18 am

Web Title: police registered offense on sand smuggler but made mistake in name
Next Stories
1 संघर्ष समितीचा पोटनिवडणुकीवर बहिष्कार
2 उंबरमाळी, तानशेतच्या उद्घोषणांना सुरुवात
3 बदलापूर नगरपालिकेची ‘स्मार्ट’ वसुली!
Just Now!
X