News Flash

भाजप आमदाराचा पोलीस ठाण्यात ठिय्या

मीरा रोड येथील कनाकिया भागात सेव्हन इलेव्हन हॉटेल एक पंचतारांकित क्लब उभारत आहे.

भाजप आमदाराचा पोलीस ठाण्यात ठिय्या
आमदार नरेंद्र मेहता

भावावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप

 भाईंदर : मीरा रोड येथे कांदळवनाचा नाश केल्याप्रकरणी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांचे बंधू विनोद मेहता यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत नरेंद्र मेहता मीरा रोड पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. त्यांच्यासोबत महापौर डिंपल मेहता याही उपस्थित होत्या. गुन्हा दाखल केल्याप्रकरणी बंधू विनोद मेहता यांना अटक करा, अन्यथा खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी मेहता यांनी यावेळी केली. सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र आमदारांची ही निव्वळ स्टंटबाजी असून पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे.

मीरा रोड येथील कनाकिया भागात सेव्हन इलेव्हन हॉटेल एक पंचतारांकित क्लब उभारत आहे. आमदार नरेंद्र मेहता यांचे बंधू आणि महापौर डिंपल मेहता यांचे पती विनोद मेहता हे सेव्हन इलेव्हन हॉटेलचे संचालक आहेत. क्लबचे बांधकाम करताना करण्यात आलेल्या मातीभरावात कांदळवनाचा नाश झाला असल्याची तसेच सीआरझेडच्या क्षेत्रात कुंपण भिंत बांधण्यात येत असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आणि पर्यावरणवाद्यांनी महसूल विभागाकडे केली होती. या तक्रारीनंतर नवघर तलाठय़ांनी जागेचा पंचनामा केला आणि त्यानंतर तहसीलदारांच्या आदेशानंतर मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांनी विनोद मेहता यांच्यासह अन्य आठ जणांवर मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याआधीही विनोद मेहता यांच्यावर याच जागेत मातीभराव केल्याप्रकरणी आणि तिवरांचा नाश केल्याप्रकरणी दोन वेळा गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर संतप्त झालेले आमदार नरेंद्र मेहता गुरुवारी सायंकाळी उशिरा मीरा रोड पोलीस ठाण्यात दाखल झाले. या प्रकरणात तीन वेळा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे एकतर तीन वेळा गुन्हे दाखल केलेल्या विनोद मेहता यांना पोलिसांनी अटक करावी अन्यथा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका मेहता यांनी यावेळी घेतली. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले माजी नगरसेवक प्रशांत केळुस्कर यांनी २०१२ मध्येच सेव्हन इलेव्हन हॉटेलच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. असे असतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे मेहता यांचे म्हणणे आहे. महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित होते. या प्रकरणावर रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार मेहता यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध

आमदारांच्या या पवित्र्याचा सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे. आमदार आणि महापौरांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडून राजकीय पदाचा वापर पोलिसांवर आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी केला आहे. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी आमदार, महापौर आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतरांवर गुन्हे दाखल करायला हवेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रोहित सुवर्णा यांनी केली आहे.

महसूल विभागाने आपले काम केले आहे. पुढील चौकशी पोलीस करतील.

– सुदाम परदेशी, प्रांतअधिकारी, महसूल विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2018 3:54 am

Web Title: police registers fir against bjp mla narendra mehta brother for destruction of mangroves
Next Stories
1 दुकानांतच बेकायदा बीअरपान!
2 घरगुती मसाले, लोणचे, पापड बनविण्यासाठी महिलांची लगबग
3 कुटुंब संकुल : रहिवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य
Just Now!
X