मागील विधानसभा निवडणुकीत आश्चर्यकारक यश मिळविणाऱ्या एमआयएम या पक्षाने नालासोपाऱ्यात प्रवेश करण्याचा पहिला प्रयत्न हिंदुत्ववादी संघटनेच्या विरोधामुळे बारगळला आहे. तांत्रिक कारणे देत पोलिसांनी ऐन वेळी परवानगी नाकारली.
राज्याच्या अनेक महापालिकांमध्ये आपले वर्चस्व निर्माण केल्यानंतर एमआयएम या पक्षाने वसई-विरार महापालिकेत प्रवेश करण्याची तयारी सुरू केली होती. नालासोपारा पश्चिमेचा भाग हा मुस्लीम लोकसंख्या असलेला आहे. या ठिकाणी रविवारी रात्री जाहीर सभा, पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आणि मिरवणूक असा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याची कुणकुण काही हिंदुत्ववादी संघटनांन लागली होती. शनिवारी रात्री संघटनेने पोलीस ठाण्यात जमाव करून मिरवणुकीला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. त्यामुळे पोलिसांनी मिरवणुकीला परवानगी नाकारली होती. केवळ साईनगर येथे सभेला परवानगी दिली होती. आमदार वारीस पठाण आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हाजी शेख या कार्यक्रमासाठी येणार होते. त्यांच्याकडून कुठलेही प्रक्षोभक वक्तव्य केले जाणार नाही, असे लिहून घेतले होते.
रविवारी सकाळी पुन्हा काही संघटनांनी पोलीस ठाण्यात जमाव करून कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली. त्यामुळे पोलिसांनी जिल्हाध्यक्ष तलहा मासलिया यांना बोलावून निर्माण झालेल्या तणावाची कल्पना दिली. कायदेशीर पूर्तता करून नंतर कार्यक्रम करा, असे सांगितले आणि कार्यक्रम रद्द करण्यास सांगितले. त्यामुळे रविवारी रात्री शहरात आलेल्या नेत्यांनी घरात कार्यकर्त्यांशी चर्चा केली कार्यक्रम रद्द करण्यात आला.

लोकशाही मार्गाने सामाजिक कार्य करण्यास आम्हाला आडकाठी का करण्यात आली? काही संघटनांच्या दबावापुढे पोलीस का झुकले? याबद्दल नगरविकास खाते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे. परवानगी घेऊन पुन्हा वसईत कार्यक्रम करू.
– तलहा मासलिया, एमआयएम जिल्हाध्यक्ष.