कल्याण गुन्हे शाखेतील पोलीस नाईक संजय पाटील यांनी पोलीस दलातील आपल्या बावीस वर्षांच्या सेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांचा महाराष्ट्र दिनी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील विविध पोलीस ठाण्यांमधील चार पोलिसांचा जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
संजय पाटील हे कल्याण गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. डोंबिवली पोलीस ठाणे व गुन्हे शाखेत काम करीत असताना त्यांनी खून, खंडणी, सोनसाखळी चोर, अपहरण, घरफोडी प्रकरणातील आरोपी पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षा न्यायालयाने सुनावल्या आहेत. पाटील यांची काम करण्याची धडाडी आणि गुन्हे उघडकीस आणणारे जाळे विचारात घेऊन त्यांचा पोलीस महासंचालक चिन्हाने सन्मान करण्यात आला.
पोलीस दलात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल, वाखाखण्याजोगी कामगिरी केल्याबद्दल संजय पाटील यांना १७८ बक्षिसे देऊन विविध संस्थांनी गौरविले आहे. याशिवाय, सुरेश मोरे, मुरलीधर सावंत, प्रकाश कदम, उदय पालांडे या ठाणे गुन्हे शाखेतील पोलिसांचा पोलीस महासंचालक चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.