05 December 2020

News Flash

आठ महिन्यांनी तरुणाचा शोध

घरातील गरिबीला कंटाळून तो घर सोडून गेला होता.

ठाणे : टाळेबंदीपूर्वी घर सोडून गेलेल्या ३० वर्षीय मुलाचा शोध घेण्यास मुरबाड पोलिसांना यश आले आहे. आठ महिन्यांपासून हा तरुण पुण्यातील चाकण भागात मजुरी करत होता. घरातील गरिबीला कंटाळून तो घर सोडून गेला होता. अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मुरबाड भागात ३० वर्षीय तरुण त्याच्या आईसोबत राहतो. हा तरुण १२वी शिकलेला आहे. मात्र नोकरी नसल्याने आईची मजुरीचे काम करते. त्यावरच त्यांचे घर चालते. २८ फेब्रुवारीला हा तरुण घर सोडून निघून गेला. त्याच्या आईने तो हरविल्याची तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची नोंद मुरबाड पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. पोलिसांनी सर्वप्रथम त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, त्याचा मोबाइल बंद होता. त्यामुळे  शोध लागत नव्हता.  त्यानंतर लगेचच टाळेबंदी लागू झाली. पोलिसांवर कायदा सुव्यवस्था राखण्याचा भार वाढला होता. त्यामध्येही पोलिसांकडून वारंवार या मुलाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क करण्यात येत होता. ऑक्टोबर महिन्यात त्याने अचानक एका मोबाइल क्रमांकावरून आईला संपर्क साधला आणि आपल्याला कोणी तरी कोंडून ठेवल्याची माहिती त्याने आईला दिली.  तरुणाच्या आईने तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बंद झाला होता. पोलिसांनी त्या क्रमांकाचे स्थळ तपासले. ते पुण्यातील चाकण भागात दाखविले. मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामदास शिंदे आणि जयराम मोरे यांचे पथक ७ ऑक्टोबरला घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी तेथे एक कंपनी पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी तेथील एका सुरक्षा रक्षकाला ओळख पटविण्यासाठी तरुणाचे छायाचित्र दाखविले.  हा तरुण याच ठिकाणी मजुरीचे काम करत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्या तरुणाला ताब्यात घेतले आणि मुरबाडला त्याच्या आईच्या ताब्यात दिले. या तरुणाने घरातील परिस्थितीमुळे परत न येण्याचा विचार केला होता. पुण्यात आल्यानंतर त्याने मजुरी सुरू केली होती आणि तिथेच तो राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 2:22 am

Web Title: police searched young man after eight months zws 70
Next Stories
1 शहरबात : ग्रामीण ठाण्याचे आरोग्य सक्षमीकरण कधी?
2 पोलिसांच्या शोधमोहिमेत ‘एका शब्दा’चा आधार
3 रात्र निवारा केंद्राच्या इमारतीची दुरवस्था
Just Now!
X