पोलिसांकडून १५ दिवसांत ३,५४२ वाहने जप्त; ३५४ गुन्हे दाखल

वसई : पालघर जिल्ह्यामध्ये विनाकारण रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. मागील १५ दिवसांत पोलिसांनी तीन हजारांहून अधिक वाहने जप्त केली.

टाळेबंदीच्या काळात अनेक जण वेगवेगळी कारणे देत वाहनातून रस्त्यावर फिरत होते. यामुळे टाळेबंदीच्या तसेच जमावबंदीच्या नियमांचे उल्लंघन होत होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या कलम १४४ (१)(३) अन्वये मनाई आदेश काढले होते. या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता कुठल्याही प्रकारच्या वाहनांना रस्त्यावर धावण्यास मनाई करण्यात आली होती. त्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. ३० मार्चपासून पोलिसांनी ही कारवाई सुरू केली होती. इतर वाहनांनी रस्त्यावर येऊ  नये यासाठी वाहनांना पेट्रोल देऊ  नये असे आदेशही काढण्यात आले होते. पोलिसांनी दररोज ही कारवाई सुरू ठेवली असून मागील १५ दिवसांत पोलिसांनी ३ हजार ५४२ वाहने जप्त केली आहेत तर तब्बल ३५४ गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे विनाकरण भटकणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले आहे.

मंगळवार १४ एप्रिल या एकाच दिवसात पोलिसांनी तब्बल आठ गुन्हे दाखल करून ३५४ वाहने जप्त केली आहेत. त्यात नालासोपारा पूर्वेकडील तुिळज पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४०, नालासोपारा पश्चिमेला ५० तर विरारमध्ये ६० वाहने जप्त केली आहेत. अत्यावश्यक कारणांशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सांगितले. हजारोंच्या संख्येने जप्त केलेली वाहने जमा झाल्याने पोलिसांनी ती ठेवण्यासाठी शहरातील जागा निश्चित केल्या असून तिथे ही वाहने ठेवण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

४८ लाखांची दंडवसुली

मीरा-भाईंदर शहरांत २१ दिवसांच्या टाळेबंदीत विनाकारण फिरणाऱ्या १३ हजार ४७७ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक विभागाच्या तिजोरीत तब्बल ४८ लाख ८९ हजार ८०० रुपयांची भर पडली आहे.  राज्यात टाळेबंदी नियम लागू झाल्यानंतर २१ दिवसांतच मीरा-भाईंदर शहरांत १३ हजार ४७७ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यात ९ हजार ८६९ कारवाई या फक्त दुचाकी चालकांविरोधात करण्यात आल्या आहेत, तर  ३ हजार २७५ कारवाया या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरोधात करण्यात आल्या आहेत. त्याच प्रकारे या पुढे शहरात विनाकारण नागरिक फिरत असल्यास गुन्हा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.