नीलेश पानमंद

दिवसभर चायनीजच्या दुकानात काम करून दोघे कामगार नुकतेच झोपले होते. त्याच वेळेस एका फिरस्त्याने दरवाजावर लाथा मारून त्यांची झोपमोड केली. त्यामुळे संतापलेल्या दोघांनी त्याची डोक्यात दगड घालून हत्या केली. अंगावर उडालेल्या रक्तामुळे पकडले जाऊ, या भीतीने एका आरोपीने चायनीज दुकानाजवळ अंगातील टीशर्ट काढून फेकला. तो टीशर्ट पोलिसांना तपासादरम्यान सापडला आणि या हत्येचा उलगडा होऊन तीन आरोपी गजाआड झाले.

ठाणे जिल्ह्य़ातील शीळ-डायघर भागात मोकाशीपाडा परिसर आहे. या परिसरात १५ नोव्हेंबर २०१८ रोजी सकाळी ११ वाजता एक मृतदेह पडलेला होता. त्या परिसरातून जाताना हा मृतदेह एका नागरिकाच्या नजरेस पडला आणि त्याने याबाबत शीळ-डायघर पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करण्यास सुरुवात केली. त्यात ६० वर्षीय व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचे समोर आले. मृतदेहाशेजारीच पोलिसांना रक्ताने माखलेला एक दगडही सापडला. त्यामुळे या व्यक्तीची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या व्यक्तीची ओळख पटविणे आणि त्याच्या मारेकऱ्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अप्पर पोलीस आयुक्त सत्यनारायण, पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत, पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते यांच्या पथकाने तपास सुरू केला. परिसरातील नागरिकांकडे मृत व्यक्तीची विचारपूस सुरू केली. त्यात मृत व्यक्तीचे नाव मारुती लक्ष्मण पवार (६०) असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचे कुटुंब मुंब्रा-पनवेल मार्गाजवळील एका चाळीत राहते. त्याच्या कुटुंबीयांना मृतदेह दाखवून पोलिसांनी तो मारुती पवार असल्याची खातरजमा केली. तसेच पोलिसांनी त्याच्याबद्दल कुटुंबाकडेही चौकशी केली. त्यात तो फारसा घरी जात नव्हता आणि फिरस्ता म्हणूनच जीवन जगत होता, अशी माहिती पुढे आली. त्यामुळे त्याच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. या हत्येच्या तपासासाठी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पुन्हा पाहणी सुरू केली. या पथकात साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे, अशोक भंडारे, महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक कृपाली बोरसे, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, पोलिस हवालदार प्रकाश शिरसाठ, संतोष शिंदे, चंद्रकांत गोफणे, पोलीस नाईक राकेश सत्रे, दीपक जाधव, अजीज तडवी, पंकज गायकर, रतिलाल वसावे, हेमंत भामरे, पोलीस शिपाई प्रदीप कांबळे आणि अण्णासाहेब एडके यांचा समावेश होता. तपासादरम्यान एका ट्रक चालकाने त्याला दहीसर टोलनाका भागात शेवटचे पाहिले असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दहीसर टोलनाका ते मोकाशीपाडा या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच मृत व्यक्तीचे नातेवाईक, फिरस्ते आणि मोलमजूर अशा एकूण ६० ते ६५ जणांची चौकशी केली. त्यात मृताचे परिसरातील हॉटेल व्यावसायिकांसोबत किरकोळ भांडणाचे प्रसंग घडत असल्याची माहिती समोर आली. त्याच वेळेस घटनास्थळाजवळ असलेला एक चायनीजचे दुकान बंद असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यामुळे पोलिसांनी हॉटेलजवळ केलेल्या पाहणीत त्यांना एका आरोपीचा रक्ताने माखलेला टीशर्ट सापडला. घटनेच्या दिवसापासून चायनीज दुकानात काम करणारे चौघे कामगार बेपत्ता असल्याचेही समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला.

सुनील श्रीकृष्ण शाहू आणि रंजय नकुल शहा या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. दिवसभर चायनीजच्या दुकानात काम,  त्यामुळे नुकतीच झोप लागली होती आणि पवारने दरवाजावर लाथा मारून झोपमोड केली होती. त्यामुळे त्याची हत्या केल्याची कबुली दोघांनी दिली. या दोघांपैकी उर्वरित दोघे नेपाळला पळून गेले असल्याचे तपासात समोर आले. त्यापैकी राज चेपांगन चेपांग याला नोकरीचे आमिष दाखवून मुंबईत बोलावून घेतले आणि तिथे पोलिसांनी सापळा रचून त्यालाही अटक केली. या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून त्याचाही शोध पथके घेत आहेत.