भिवंडी पोलिसांचा उपक्रम; चोरीचे प्रमाण घटल्याचा दावा

ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर यासारख्या परिसरात उच्छाद मांडणाऱ्या सोनसाखळी चोरांच्या टोळ्यांचे कंबरडे मोडल्यानंतर ठाणे पोलिसांनी ही मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी आता पोलीस मित्रांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. भिवंडीत अशा तब्बल ५०० ‘पोलीस मित्रां’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप बनवण्यात आला असून सोनसाखळी चोरीच्या घटना घडताच त्याबद्दलची माहिती या माध्यमातून त्वरित पोलिसांपर्यंत पोहोचत आहे. सोनसाखळी चोरटे कोणत्या दिशेने पळाले, त्यांच्याकडे कोणती दुचाकी होती असा महत्त्वपूर्ण तपशील पोलीस मित्र एकमेकांना कळवत असल्याने चोरटय़ांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या उपक्रमामुळे भिवंडी आणि आसपासच्या परिसरातील सोनसाखळी चोरीच्या घटना कमी झाल्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील संवेदनशील भाग म्हणून भिवंडी शहराला ओळखले जाते. या भागाची कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांकडून विविध उपक्रम राबवण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून भिवंडी पोलिसांनी पोलीस मित्र संकल्पना राबवली आहे. नागरिक, विविध समाज आणि पोलीस यांच्यात चांगला सुसंवाद रहावा म्हणून पोलीस मित्र संकल्पना राबविण्यात येत आहे. शहरामध्ये आतापर्यंत १३०० जणांना पोलीस मित्र बनविण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरतेच ते मर्यादित राहिलेले नसून ते आता शहरातील वाढत्या गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठीही मदत करीत आहेत, अशी माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांनी दिली.

१३०० पोलीस मित्रांपैकी पाचशेहून अधिक पोलीस मित्रांची सोनसाखळी चोरटय़ांविरोधातील मोहिमेसाठी मदत घेण्यात येत आहे. शहरातील विविध भागात ही मंडळी कार्यरत राहतात. एखादी घटना घडली तर चोरटे कोणत्या मार्गाने निघाले आणि त्यांच्याकडे कोणती दुचाकी होती, याची माहिती पोलीस मित्रांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर टाकतात. या ग्रुपवरील पोलीस अधिकारी आणि अन्य पोलीस मित्र ही माहिती वाचून खबरदार होतात आणि त्या चोरटय़ाला पुढच्या मार्गावर पकडण्यासाठी सज्ज होतात, असेही सुधीर दाभाडे यांनी सांगितले.

ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना राबविण्यात येत असून यामुळे गेल्या दोन महिन्यांत सोनसाखळी चोरीच्या घटनांना पायबंद बसल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

पोलीस मित्रांना प्रशिक्षण

सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ात कार्यरत असलेल्या चोरटय़ांची कार्यपद्धतीची सविस्तर माहिती पोलीस मित्रांना दिली जात आहे. अशा गुन्ह्यात कार्यरत असलेले चोरटे आणि त्यांच्या टोळ्यांविषयीही त्यामध्ये माहिती दिली जाते. जेणेकरून एखाद्या परिसरात हे चोरटे फिरत असतील तर गुन्हा करण्यापूर्वीच त्यांना रोखता येऊ शकते. पोलिसांना पाहून चोरटे पळून जातात. त्यामुळे या चोरटय़ांना पकडण्यासाठी पोलीस मित्रांची मदत घेण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.