ठाणे पोलिसांची ‘ट्विटर’ तत्परता; फेसबुकवर माहिती मिळाल्यानंतर तात्काळ भुसावळ पोलिसांशी संपर्क

ठाणे : ठाणे पोलिसांच्या ट्विटर खात्यावर आलेल्या संदेशाबाबत तत्परता दाखविल्यामुळे भुसावळ येथे आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीचा जीव वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या फेसबुक खात्यावर चिठ्ठी लिहिली होती. याची माहिती ठाणे पोलिसांना मिळताच त्यांनी भुसावळ लोहमार्ग पोलिसांना संपर्क साधत घटनेची माहिती दिली. त्यानंतर भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी त्या व्यक्तीला आत्महत्या करण्यापूर्वीच ताब्यात घेतले.

बुलढाणा येथील शेगाव शहरात ४० वर्षीय व्यक्ती राहते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या घरात कौटुंबिक कलह सुरू होते. रविवारीदेखील त्याचे आई आणि बहिणीसोबत वाद झाल्याने तो घर सोडून निघून गेला होता. त्यानंतर, काही वेळाने त्याने फेसबुकवर एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. ही चिठ्ठी त्याच्या एका मित्राने पाहिली. त्यानंतर या मित्राने ती चिठ्ठी ठाणे आणि मुंबई पोलिसांच्या ट्विटर खात्यावर पाठवली. ठाणे पोलिसांनी तात्काळ त्याच्या मित्राला ट्विटरवर संपर्क साधून त्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक मागवून घेतला. त्यानंतर, कल्याण येथील कोळसेवाडी पोलिसांच्या मदतीने त्याच्या मोबाइल क्रमांकाचे ठिकाण तपासण्यात आले. त्या वेळी त्याचे शेवटचे ठिकाण भुसावळ रेल्वे स्थानक येत होते. त्यानंतर पोलिसांनी भुसावळ लोहमार्ग पोलीस, तसेच स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. माहिती मिळताच भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तसेच त्याचे समुपदेशनही करण्यात आले. त्यामुळे ठाणे पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.