७७५ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

तीन महिन्यांसाठी परवाने निलंबित होणार

वाहतूक पोलिसांकडून वारंवार केल्या गेलेल्या आवाहनानंतरही ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपाटर्य़ा झोडून दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांची झिंग पोलिसांनी काही तासांतच उतरवली. रात्री उशिरापर्यंत हॉटेल-बार खुले ठेवण्यास राज्य सरकारने दिलेल्या परवानगीमुळे मनसोक्त मद्यपान करून त्याच अवस्थेत गाडी चालवणाऱ्या ७७५ मद्यपी वाहनचालकांवर गुरुवारी रात्री कारवाई करण्यात आली. गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत जागोजागी नाकाबंदी करून उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांकडून तब्बल १० लाख ६१ हजार रुपयांचा दंड वसूल केला. केवळ दंडावरच या चालकांची सुटका होणार नसून त्यांचे वाहन परवाने निलंबित करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी त्यांची यादी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविली आहे.

नववर्षांचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी अनेक जण मद्याच्या पाटर्य़ा झोडतात आणि त्यानंतर घरी परतण्यासाठी मद्याच्या नशेत वाहन चालवितात. अशा चालकांमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दरवर्षी थर्टिफस्र्टच्या पाश्र्वभूमीवर वाहतूक पोलीस नागरिकांना मद्याच्या नशेत वाहन चालवू नका, असे आवाहन करतात. तसेच शहरामध्ये मद्यपी चालकांविरोधात विशेष मोहीम हाती घेतात. यंदाही शहरातील विविध भागांत वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी असा सुमारे पाचशे जणांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळी सुरू झालेली मोहीम शुक्रवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत सुरू होती. पोलिसांची पथके रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांची श्वास विश्लेषक यंत्राद्वारे तपासणी करीत होते.

या कारवाईत ७७५ मद्यपी चालक पोलिसांच्या जाळ्यात सापडले असून त्यांच्याकडून दहा लाख ६१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मद्यपी चालकांना आता ठाणे न्यायालयापुढे हजर व्हावे लागणार आहे. त्यामुळे या चालकांना तुरुंगाची हवा खावी लागण्याची शक्यता आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने नुकताच घेतला असून त्या आधारे थर्टिफर्स्टच्या रात्री सापडलेल्या ७७५ मद्यपी चालकांचे परवाने रद्द करण्याचे पत्र ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाला पाठविले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली.