28 October 2020

News Flash

मुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर पोलिसांकडूनही कारवाई

सर्वसाधारण सभेत ठाणे महापालिकेचा निर्णय

सर्वसाधारण सभेत ठाणे महापालिकेचा निर्णय

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून शहरात मुखपट्टीविना फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आता ही कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना देऊ केले आहेत. त्यानुसार पालिकेच्या पथकाबरोबरच पोलिसांकडून अशा प्रकारची कारवाई सुरू होणार आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील सार्वजनिक ठिकाणे, शासकीय आणि खाजगी कार्यालये या ठिकाणी वावरताना नागरिकांना मुखपट्टी वापरणे बंधनकारक केले आहे. तरीही काही नागरिक मुखपट्टीविना फिरत असून यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींवर महापालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरू केली असून त्यांच्याकडून ५०० रुपये दंड आकरण्यात येत आहे.

ही कारवाई आणखी प्रभावीपणे राबविली जावी, यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका तसेच पोलीस विभागाच्या तिजोरीत भर पडावी या उद्देशाने नव्हे तर, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारवाईची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही मोहीम नियमित राबविली जाईल, असे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी म्हटले आहे.

५० टक्के रक्कम पालिकेकडे

सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी वापरत नसलेल्या व्यक्तींकडून ५०० रुपये दंड आकरण्यात येणार आहे. पोलीस विभागाकडून अशा प्रकारचा दंड वसूल करण्यात आल्यानंतर त्यापैकी ५० टक्के रक्कम ठाणे महापालिका फंडात जमा करावी आणि उर्वरित रक्कम ही प्रशासकीय खर्च म्हणून पोलीस विभागाकडे जमा करण्यात यावी, असे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरविण्यात आले आहे.

पालिकेकडून कारवाई

विभाग             दंडवसुली

माजिवडा

-मानपाडा       ७०,०००

वर्तकनगर      ३८,०००

लोकमान्यनगर-

सावरकर        ३५,०००

वागळे इस्टेट    ४७,०००

नौपाडा-कोपरी    १,२०,०००

कळवा ३३,५००

मुंब्रा    ८१,७००

दिवा    २४,०००

एकूण   ५,०७,५००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2020 2:26 am

Web Title: police took action against those walking without masks zws 70
Next Stories
1 ठाणे परिवहन करोनाच्या विळख्यात
2 रस्तेकामांना कचऱ्याच्या डब्याची सुरक्षा
3 श्वानांच्या सुरक्षेसाठी रेडियमचे पट्टे
Just Now!
X