शिळफाटा येथे पोलिसांचे वाहन चुकीच्या मार्गिकेतून

शिळफाटा चौकातून पनवेल, नवी मुंबई, ठाणे दिशेकडे जाणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे काही वाहनचालक वाहतुकीच्या नियमाचा भंग करून विरुद्ध दिशेने असलेल्या मार्गिकेतून वाहन पुढे रेटण्याचा प्रयत्न करतात. मात्र सर्वसामान्य वाहनचालकांकडून होणारी ही चूक आता पोलीस विभागही करू लागला आहे. कल्याण-शिळफाटा मार्गावरील कोंडी चुकवण्यासाठी पोलिसांची वाहने अगदी दररोजच विरुद्ध दिशेने मार्गक्रमण करताना दिसत आहेत.

शिळफाटा रस्त्यावर सर्वाधिक वाहतूक कोंडी ही वाढत्या वाहनसंख्येमुळे आहे. मात्र या मार्गावर अनेकदा वाहनचालक विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवर वाहन चालवत असल्याने कोंडीत आणखी भर पडते. चुकीच्या मार्गिकेतून आलेल्या वाहनचालकावर वाहतूक पोलिसांकडून वरचेवर कारवाई केली जात असते. असे असताना या मार्गिकेवरून पोलिसांची वाहनेही जाऊ लागल्याने त्यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत.

गुरुवारी दुपारी शिळफाटा चौक परिसरात नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी झाली होती. या वेळी पोलिसांचे एक वाहन या वाहन कोंडीत अडकले. अर्धा ते पाऊण तास वाहने जागची हलत नाही, हे पाहून अनेक वाहनचालक विरुद्ध मार्गिकेत शिरून (शिळफाटा चौकातून कल्याणकडे येण्यासाठी डावी मार्गिका आहे. उजवी मार्गिकेवर वाहन कोंडी असल्याने चालक डाव्या मार्गिकेत शिरतात.) प्रवास करू लागले. पोलिसांच्या वाहनानेही हाच चुकीचा मार्ग अवलंबला. विरुद्ध मार्गाने अनेक वाहने येऊ लागल्याने या मार्गावरही वाहतूक कोंडी झाली.

कोंडीला पोलीसच जबाबदार

पनवेल दिशेकडून संध्याकाळच्या वेळेत मोठे कंटेनर, ट्रेलर, अवजड वाहने शिळफाटा चौकाकडे येऊ लागली की वाहतूक पोलीस ही वाहने शिळफाटा येण्यापूर्वीच रस्त्याच्या कडेला अडवतात. या वाहनांच्या पाठीमागील हलक्या वाहनांना पुढे जाऊ देतात. अशा प्रकारे अवजड वाहने एकापाठोपाठ वाहतूक पोलीस अडवून ठेवतात. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. अगदी वाहनांच्या रांगा दहिसर मोरीपर्यंत जातात. वाहतूक पोलिसांनी अवजड वाहने दहिसर मोरी परिसरातील माळरानावर अडवून ठेवली तर रस्त्यावर वाहने उभी करावी लागणार नाहीत. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते, असे या रस्त्यावरून नियमित प्रवास करणाऱ्या सचिन बाबर यांनी सांगितले.

उलट मार्गिकेतून प्रवास करणाऱ्या चारचाकी, दुचाकी चालकांना जबर दंड ठोठावला, त्यांचा वाहन परवाना निलंबित करण्याची शिफारस आरटीओ अधिकाऱ्यांना केली, तर चुकीच्या मार्गिकेतून चालक वाहने चालवणार नाहीत, पण हे प्रकार घडत नसल्याने प्रवाशांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, असे गजानन भाग्यवंत या यांनी सांगितले.