नववर्षांच्या स्वागतात गैरप्रकार रोखण्यासाठी व्यूहरचना; प्रत्येक ‘पार्टी’च्या ठिकाणी सीसीटीव्ही बंधनकारक
नवीन वर्षांच्या स्वागतासाठी, ३१ डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या स्वागत पाटर्य़ामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी वसई पोलिसांनी आतापासूनच व्यूहरचना आखली आहे. यासाठी मोठय़ा पार्टीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सक्ती आयोजकांवर करण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री नेहमीप्रमाणे प्रमुख रस्ते, चौक येथे पोलिसांचा बंदोबस्त असणार आहेच; पण यासोबतच अनेक ठिकाणी चालणाऱ्या पाटर्य़ामध्ये गैरप्रकार तर होत नाहीत ना, हे तपासण्यासाठी साध्या वेशातील पोलीस थेट पार्टीतच धडक मारणार आहेत.
नाताळ सणापासून नववर्षांपर्यंतचा काळ हा वसईत उत्सवाचा काळ मानला जातो. या काळात असलेल्या सुट्टय़ा आणि सणामुळे वसईत विविध पाटर्य़ाचे आयोजन केले जाते. ३१ डिसेंबरच्या रात्री हा जल्लोश टिपेला पोहोचतो. वसईच्या किनारपट्टीलगत अनेक रिसॉर्टस् असून तेथे मोठमोठय़ा पाटर्य़ाचे आयोजन केले जाते. यंदाही वसईत मोठय़ा प्रमाणात ‘थर्टी फर्स्ट’ साजरा होण्याची शक्यता आहे.
या उत्साह आणि जल्लोशाला अनुचित प्रकारांमुळे गालबोट लागू नये, यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. वसई विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी याबाब माहिती देताना सांगितले की, कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक पार्टीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. खासगी बंगल्यात पार्टी करताना मद्यविक्रीचा परवाना आवश्यक आहे. तसेच रिसॉर्टमध्येही मद्यविक्रीचा परवाना आवश्यक आहे. ते आम्ही तपासणार आहोत. शहरात कुठेही विनयभंगाच्या घटना घडू नयेत यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वसईत कुठे ‘रेव्ह पाटर्य़ा’ होणार आहेत का, त्यावरही पोलीस लक्ष ठेवून आहेत. पाटर्य़ामध्ये अमली पदार्थ दिले जाऊ नयेत यासाठी पोलिसांनी अशा अमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवून शोधमोहीम सुरू केली आहे. अनेकदा पाटर्य़ामध्ये गैरप्रकार होत असतात. त्यासाठी महत्त्वाच्या पाटर्य़ामध्ये साध्या वेशातले पोलीस पाठवण्याची व्यूहरचना तयार केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.