अंबरनाथ येथील महात्मा गांधी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दुचाकीवरून जात असताना पोलीस कर्मचारी संजीव पाटील यांना कल्याण-बदलापूर या राज्य महामार्गावरील खड्डय़ामुळे जीव गमावावा लागला. पाटील यांची दुचाकी खड्डय़ात आदळून  घसरली असतानाच मागून येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने रस्त्यांवरील खड्डय़ांचे भीषण वास्तव उजेडात आणले आहे. या राज्य महामार्गावर गेल्या पाच वर्षांत झालेल्या अपघातांतील हा ३०वा बळी आहे.

ठाणे वाहतूक शाखेच्या अंबरनाथ विभागामध्ये पोलीस कर्मचारी संजीव बन्सीलाल पाटील हे कार्यरत होते. मंगळवारी रात्री ८.४५ वाजता ते फॉरेस्ट नाका येथे कर्तव्यावर होते. त्या वेळेस अंबरनाथ येथील महात्मा गांधी चौकात वाहतूक कोंडी झाली. ही कोंडी सोडविण्यासाठी ते दुचाकी घेऊन निघाले. अंबरनाथ पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावरील एका खड्डय़ात त्यांची दुचाकी आदळली आणि त्यामुळे ते दुचाकीवरून खाली पडले.

त्याचदरम्यान पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकची त्यांना धडक बसली. त्यांचे दोन्ही पाय ट्रकच्या चाकाखाली आल्याने ते गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांच्या शरीरातून मोठय़ा प्रमाणावर रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. ते अंबरनाथ येथील कानसई भागात राहत होते.

मंगळवारी रात्री झालेल्या या अपघाती मृत्यूमुळे अंबरनाथ शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर या राज्य महामार्गावरील फॉरेस्ट नाका ते मटका चौक या रस्त्यावर अनेक ठिकाणी झालेले खोदकाम तसेच रस्त्याच्या मध्यभागी असलेला धोकादायक दुभाजक यामुळे गेल्या पाच वर्षांत तीस वाहनचालकांचे मृत्यू झाले आहेत. मात्र अद्यापही हे अपघात रोखण्यात आणि रस्तेदुरुस्ती करण्यात प्रशासकीय यंत्रणांना यश आलेले नाही.

रस्त्याची दयनीय अवस्था

शासकीय यंत्रणामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण-बदलापूर रस्ता आजही अपघातांचे केंद्र ठरत आहे. गेल्या वर्षी या रस्त्याच्या उर्वरित रुंदीकरणासाठी एमएमआरडीएने ४६ कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र अतिक्रमण काढणे, राज्य रस्त्याची मध्यरेषा निश्चित करणे आणि या रस्त्याखालील विविध जलवाहिन्या स्थलांतरित करणे यामुळे या रस्त्याचे काम निधी मंजूर होऊनही मार्गी लागू शकलेले नाही. त्यामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.