नवरदेवासह तिघांना अटक, २५ जणांवर गुन्हा

विरार पोलिसांनी अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याचा प्रयत्न ऐन वेळी कारवाई करून उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी लग्नाला हजर असणाऱ्या २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करून नवरदेवासह तीन जणांना अटक केली आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील बावखळ पाडा येथील हनुमान मंदिरात एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात येत असल्याची माहिती एका स्वयंसेवी संस्थेने विरार पोलिसांना दिली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन विवाह थांबवला आणि मुलीची सुटका केली. १६ वर्षीय मुलीचे २८ वर्षीय तरुणाशी लग्न लावून देण्यात येत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी नवरदेव वसंत राठोड, मुलाची आई झिमाबाई राठोड आणि मुलीचे वडील विजय जाधव यांना अटक केली आहे. तसेच लग्नाच्या वेळी हजर असणाऱ्या २५ जणांवर बालविवाह प्रतिबंध कायदा २००६ नुसार कलम ९ व ११ नुसार गुन्हा दाखल केला आहे. उर्वरित आरोपींवर अटकेची कारवाई सुरू असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी दिली.

आम्हाला या बालविवाहाबाबत माहिती मिळताच आम्ही जाऊन कारवाई केली आणि आरोपींवर गुन्हा दाखल केला, अशी माहिती विरारचे उपअधीक्षक जयंत बजबळे यांनी दिली. आरोपी हे वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानिव बाग येथील बंजारा वसाहतीत राहतात. मुलीच्या मर्जीविरोधात हे लग्न लावून देण्यात येत होते.