भाईंदरमध्ये पोलिओ लसीकरणात अल्पवयीन विद्यार्थ्यांचा सहभाग; नागरिकांकडून संताप

पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी देशभरात ‘पल्स पोलिओ मोहीम’ राबवली जात आहे. मीरा-भाईंदर महापालिकेनेही शहरातील लहान बालकांना पोलिओ डोस देण्यास सुरुवात केली आहे, परंतु भाईंदर पश्चिम येथे बालकांना पोलिओ डोस देण्यासाठी चक्क अल्पवयीन शालेय मुलांचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याच्या या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत लहान मुलांना लस पाजण्याचे आवाहन सध्या पालिकेच्या आरोग्य विभागाकडून केले जात आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागात यासाठी लस पाजणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे कर्मचारी घरोघरी जाऊन लहान मुलांची चौकशी करतात. लहान मुले आढळून आली तर त्यांना लस पाजण्याचे काम हे कर्मचारी करतात. यासाठी कर्मचाऱ्यांना पोलिओ लसचे किट दिले जाते. विशिष्ट तापमानात एका शीतपेटीत ही लस ठेवण्यात येत असते. लसीकरण करत असताना त्याची काळजी घेण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर असते, परंतु भाईंदर पश्चिम येथील परिसरात चक्क सातव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लस पाजण्याचा कामाला लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लसीकरणासारखी महत्त्वाची कामे अल्पवयीन मुलांकडून करवून घेण्यात येत असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आशा सेविकांच्या संपामुळे..

पल्स पोलिओ लसीकरणाच्या मोहिमेत महापालिकेच्या आरोग्य विभागात याआधी असलेल्या आशा सेविका महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होत्या. लसीकरणाचे बहुतांश काम आशा सेविकाच पार पाडत होत्या. मात्र आपल्या मागण्यांसाठी आशा सेविका अचानक संपावर गेल्यानंतर त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आलेले नाही. त्यामुळेच लसीकरणासाठी शालेय विद्यार्थ्यांना हाताशी घेण्यात आले असल्याचा आरोप आता करण्यात येत आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

  • भाईंदर पश्चिम येथील टेंभा रुग्णालय आणि स्थानिक संस्था कर कार्यालयावरून जाणाऱ्या रस्त्यावरील राज आसमान या इमारतीमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास दोन लहान शाळकरी मुले पोलिओ लसीकरणासाठी आली असल्याचे या इमारतीत राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यां स्नेहल पवार यांच्या निदर्शनास आले.
  • त्यांच्याकडे लस ठेवण्यासाठीची शीतपेटीदेखील नव्हती. पोलिओच्या लस हातात घेऊन ही मुले फिरत असल्याचे दिसून आले.
  • त्यांनी मुलांची चौकशी केली असता एका खासगी शाळेत सातव्या इयत्तेत शिकत असल्याचे मुलांनी सांगितले.
  • या मुलांना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून ओळखपत्रेदेखील बनवून देण्यात आली असल्याचे पाहून पवार यांना धक्काच बसला.
  • पोलिओ लस ही लहान मुलांच्या आरोग्याशी निगडित असलेली बाब आहे. लस देताना कोणताही निष्काळजीपणा झाल्यास लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
  • पल्स पोलिओच्या कमाला लहान मुलांना जुंपून मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी स्नेहल पवार यांनी केली आहे.

पोलिओ लसीकरणासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करण्यास स्पष्टपणे मनाई करणारे आदेश प्रत्येक आरोग्य केंद्राला देण्यात आले आहेत. यानंतरही भाईंदर पश्चिम येथील आरोग्य केंद्राकडून असा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून चौकशीनंतर कारवाई करण्यात येईल.

डॉ. अंजली पाटील, वैद्यकीय अधिकारी, मीरा-भाईंदर महापालिका