News Flash

नोटांच्या रांगेतून मतांच्या वाटा!

बँका आणि एटीएमबाहेर रांगा वाढू लागताच मंडप उभारण्याचे कामही केले जात असल्याचे चित्र आहे.

बँकांच्या दारातील रांगेत राजकीय कार्यकर्त्यांचीही झुंबड उडाली आहे.

बँकेत नागरिकांना पाणी, बिस्किटांचे वाटप; सत्कार्य करताना पक्षाच्या जाहिरातबाजीलाही उधाण

आठवडा लोटल्यानंतरही पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचा गोंधळ संपला नसल्याने बँकांच्या दारातील रांगेत तिष्ठत उभ्या असलेल्या नागरिकांचे कंबरडे मोडायची वेळ आली आहे. भर उन्हात तासन्तास उभ्या असलेल्या नागरिकांना पाणी पुरवण्यासाठी विविध सामाजिक संस्था पुढाकार घेत असतानाच ठाण्यात राजकीय मंडळींनीही या कामी हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. राजकारण्यांच्या या सत्कार्याचे कौतुक होत असतानाच यामागे तीन महिन्यांत होऊ घातलेल्या महापालिका निवडणुका तर नाहीत ना, असा सवाल नागरिक विचारीत आहेत.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आपले नाव सतत मतदारांपुढे यावे यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अशा प्रमुख पक्षांनी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. यंदा सण-उत्सवांच्या काळात शुभेच्छांच्या नावाखाली ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा यांसारख्या भागात जोरदार राजकीय जाहिरातबाजी सुरू असल्याचे चित्रही दिसून आले. दिवाळसणात उटणे, भेटवस्तू, भेटकार्ड पाठवीत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्नही इच्छुक उमेदवार तसेच राजकीय नेत्यांकडून करण्यात आला. मात्र, सणांचा हंगाम संपताच प्रचाराचे माध्यमही काही प्रमाणात थंडावल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत होते. असे असताना चलन बंदीच्या निर्णयामुळे नागरिकांची उडालेली धांदल लक्षात घेऊन राजकीय पक्ष त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्याचे चित्र दिसू लागले आहे.

गेल्या आठवडाभर संपूर्ण देशभरात पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने उडालेल्या कल्लोळामुळे सर्वसामान्य रहिवासी हैराण झाले आहेत. जुन्या नोटा बदलण्यासाठी बँकांबाहेर पहाटेपासून रांगा लागत असल्याचे चित्र आहे. ठाणे शहरातील बँका, एटीएममध्ये दररोज ग्राहकांच्या मोठय़ा रांगा लागत असून तासन्तास ताटकळत राहावे लागत असल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. असे असताना प्रभागातील बँकांबाहेर रांगा लावून उभे राहणाऱ्या मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देत त्यांना खूश करण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांनी सुरू केला आहे. गळय़ात राजकीय पक्षांचे पट्टे फडकवत अनेक इच्छुक ग्राहकांना पाणी, बिस्किट, टोप्यांचे वाटप करीत असल्याचे चित्र महापालिका हद्दीत दिसत आहे. त्याची समाजमाध्यमांवर पद्धतशीरपणे जाहिराती केल्या जात असून ‘मिशन-२०१७’ या नावाने नेटकरांनाही भुलविण्याचा प्रयत्नही केला जात आहे.  बँका आणि  एटीएमबाहेर रांगा वाढू लागताच मंडप उभारण्याचे कामही केले जात असल्याचे चित्र आहे.

सेनाभाजप अग्रभागी

ग्राहकांना खूश करण्यासाठी शिवसेना-भाजपचे इच्छुक उमेदवार या कामासाठी अग्रभागी असल्याचे चित्र असून ठाण्यातील नौपाडा, वागळे इस्टेट, उथळसर, कासारवडवली, वाघबीळ या भागांत गळ्यात पक्षाचे झेंडे मिरवीत इच्छुकांची मांदियाळी बँकांबाहेर दिसू लागली आहे. मुंब््रयात एमआयएमचे काही पदाधिकारी बँकांबाहेर ग्राहकांना पाणी तसेच टोप्या वाटप करताना दिसू लागले असून दिव्यातही भाजपचे पदाधिकारी नित्यनेमाने ग्राहकांसाठी बँकांबाहेर डेरा जमवून बसल्याचे चित्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 1:21 am

Web Title: political benefits by note banned issue
Next Stories
1 नामवंतांचे बुकशेल्फ : वाचनाने जगणे अर्थपूर्ण होते..
2 फुलपाखरांच्या जगात : पेंटेड सॉ टूथ
3 मुजोर रिक्षाचालकांची तक्रार करायची कुठे?
Just Now!
X