News Flash

बदलापुरात लशीसाठी वशिलेबाजी

राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची अरेरावी

राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची अरेरावी

लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना आकर्षित करण्यासाठी एकही संधी न सोडणाऱ्या बदलापूर शहरातील राजकीय पदाधिकाऱ्यांनी आता लसीकरण केंद्रांचाही ताबा घेण्यास सुरुवात केल्याची बाब समोर आली आहे. यामुळे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून लसीकरण करण्यासाठी शासकीय केंद्रांवर जाणाऱ्या नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. तर, राजकीय पक्षाचे पदाधिकारी दमदाटी करून आपल्या मतदारांचे लसीकरण करीत आहेत. यातूनच एका तरुणाला मारहाण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बदलापूरच्या लसीकरण केंद्रांवरील राजकीय वशिलेबाजीविरोधात नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

बदलापूर शहरात चार ठिकाणी लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात बदलापूर पूर्वेतील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी बदलापूर पूर्व तसेच पश्चिमेतील नागरिकही लसीकरणासाठी येत आहेत. बुधवारी अशाच प्रकारे बदलापूर पश्चिमेतील एका तरुणाने आई-वडिलांच्या लसीकरणासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली होती आणि तो आई-वडिलांना ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात लस घेण्यासाठी घेऊन आला होता. त्यावेळी बराच वेळ विविध पक्षाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आपल्यासोबत चार-पाच नागरिकांना घेऊन येऊन थेट लसीकरणाच्या ठिकाणी प्रवेश देत होते. त्यामुळे त्या तरुणाने राजकीय पक्षाच्या एका युवा पदाधिकाऱ्याला हटकले. त्यामुळे त्या पदाधिकाऱ्याने त्या तरुणाच्या कानशिलात लगावली. या वेळी तरुणाच्या डोळ्याला काही अंशी दुखापत झाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्याच पदाधिकाऱ्याने तातडीने तरुणाला खासगी दवाखान्यात नेऊन उपचार केले.

गैरसमजातून वाद वाढले

याबाबत बदलापूर उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रतिक्रियेसाठी वारंवार संपर्क करण्यात आला. मात्र ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ  शकले नाहीत. गेल्या काही दिवसांत लसीकरणासाठी मोठय़ा संख्येने नागरिकांची गर्दी होत असल्याने आणि अनेकदा ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी त्यांच्या घरातील तरुण रांगेत उभे राहत असल्याने गैरसमाजातून वाद होत असल्याची माहिती येथील एका वैद्यकीय कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 12:19 am

Web Title: political interference on vaccination in badlapur zws 70
Next Stories
1 बेकायदा रेती उपसा
2 ऐन लग्नसराईत कापड दुकानदारांची उपासमार
3 भाईंदर खाडीपुलाचा अडथळा दूर
Just Now!
X