तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये मतदारांना खूश करण्यासाठी नगरसेवकांनी नागरिकांना उपयुक्त ठरतील, अशा शिबीर आयोजनाचा धडाका लावला आहे.
या शिबिरांमध्ये महाआरोग्य शिबीर, पॅन कार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र मिळून देण्याचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय गाण्यांच्या, सत्कारांच्या कार्यक्रमांचा धडाकाही लावण्यात आला आहे. आरोग्य शिबिरांचे कार्यक्रम आयोजन इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांमार्फत करवून घेतले जात आहेत. सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या मोफत करून मिळत असल्याने नागरिक मोठय़ा संख्येने या उपक्रमात सहभागी होत आहेत. पॅन कार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र ही अलीकडची मोठी गरज आहे. त्यामुळे शिबिरांचा लाभ नागरिक उठवत आहेत. या शिबिरांचे आयोजन करताना नगरसेवक प्रवेशद्वारावर एक नोंदणी वही ठेवतात. या नोंदणी वहीत लाभार्थी नागरिकाने स्वत:चा पत्ता, भ्रमणध्वनी लिहायचा. मग त्याला शिबिरात प्रवेश मिळतो. या शिबिरात नगरसेवक, त्यांचे समर्थक आवर्जून शिबिरार्थीची आस्थेने चौकशी करतात. त्यांना चहापाणी, बिस्किटे, नाष्टय़ाची व्यवस्था करतात, असे शिबिराच्या ठिकाणी चित्र आहे.
मनसेचे नगरसेवक राजन मराठे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी अशा शिबिरांच्या आयोजनाचा धडाका लावला आहे. कोपर रोड भागाचा नगरसेवक तर केवळ ओळखपत्र शिबिरे भरवून यापूर्वी निवडून आला होता, असे सांगण्यात येते.
काही नगरसेवक महापालिकेच्या सुविधेचा लाभ न घेता आपली खासगी यंत्रणा कामाला लावून गटार, रस्ते सफाई करून घेत आहेत. काही नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील तरुणांना आकर्षित करण्यासाठी मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून दिली आहे.
ही सुविधा घेताना नगरसेवकाच्या कार्यालयात तरुणांना नाव, पत्ता, भ्रमणध्वनीची नोंदणी करावी लागते. काही नगरसेविकांनी प्रभागात हळदीकुंकू, गाण्यांचे कार्यक्रम, प्रभागातील गुणवंत कलाकार, व्यक्तींचा सत्कार करून नागरिकांना आपलेसे करण्याचे कार्यक्रम सुरू केले आहेत.

विकासकामांचा बट्टय़ाबोळ नि कार्यक्रमांची चलती
गेल्या चार वर्षांत शहरातील विकास कामांचा बट्टय़ाबोळ झाला आहे. त्या विषयी पालिका अधिकारी, ठेकेदारांना कधीही फैलावर न घेणारे नगरसेवक, नगरसेविका यापुढील काळात मतांची बेगमी करण्यासाठी नागरिकांना मनोरंजन आणि सेवा सुविधांच्या कार्यक्रमात गुंतवून आपलेसे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या उपक्रमातून सुदृढ होणारे मतदार नागरिक पालिका निवडणुकीच्या वेळी शहरातील बकालपणाला प्राधान्य देतात की नगरसेवकांच्या आरोग्य शिबिराला हे आता काळच ठरवणार आहे.

ही शिबिरे, कार्यक्रम
* महाआरोग्य शिबीर
* पॅन कार्ड शिबीर
* ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र
* ओळखपत्र शिबीर
* मोफत वायफाय सेवा
* गुणवंत नागरिक, विद्यार्थ्यांचा सत्कार
* हळदीकुंकू कार्यक्रम
* मनोरंजनात्मक कार्यक्रम