ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांना बेकायदा झोपडय़ांचा विळखा बसलेला असतानाच या शहरांमध्ये नव्याने उभ्या राहणाऱ्या झोपडय़ांना राजकीय पक्षांचे पाठबळ लाभत असून अशा झोपडय़ा वाचविण्यासाठी काही राजकीय पक्षांकडून राष्ट्र पुरुषांचे फलक जागोजागी लावण्यात येत आहेत, असा धक्कादायक आरोप स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांनी सभेत केल्याने खळबळ उडाली. नव्या झोपडय़ांना कराची आकारणी करा असा आग्रह तुम्ही धरता, मग झोपडय़ा वाढू नयेत यासाठीही तेवढाच आग्रह धरा, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. दरम्यान, महापुरुषांचे फलक लावून नव्याने उभ्या राहिलेल्या झोपडय़ा आणि त्यांच्या आश्रयदात्यांची चौकशी करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून ठाणे, कळवा तसेच मुंब्रा भागात मोठय़ा प्रमाणात झोपडय़ा उभ्या राहिल्या असून या तिन्ही शहरातील झोपडय़ांचे प्रमाण सुमारे ५३ टक्केच्या घरात आहे. शहरात अशा स्वरूपाच्या सुमारे २५२ झोपडपट्टय़ा आहेत. त्यामध्ये दोन लाख ४५ हजार कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या तिन्ही शहरांना बेकायदा झोपडय़ांचा विळखा बसल्याचे चित्र आहे. असे असतानाच या शहरांमध्ये नव्याने झोपडय़ा उभ्या राहत असल्याचा आरोप रिपाइंचे नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी केला. या मुद्दय़ावरून चर्चा करीत असताना तायडे यांनी कोपरी भागात अशा स्वरूपाच्या झोपडय़ा मोठय़ा संख्येने उभ्या राहत असल्याचे सांगत या झोपडय़ांचा आकडा सुमारे आठशेच्या घरात असल्याचा दावा केला. यावेळी शिवसेनेचे कळव्यातील नगरसेवक बालाजी काकडे आणि सुधीर भगत यांनी नव्याने झालेल्या बांधकामांना कर आकारणी करा, अशी मागणी लावून धरली. वन विभागाच्या क्षेत्रात उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांना कर आकारणी करा, म्हणजे उत्पन्नात वाढ होईल, असा आग्रही यापैकी काहींनी धरला. यामुळे संतापलेल्या सभापतींनी सदस्यांचे कान उपटले. कर आकारणी करण्यासाठी आपण आग्रही असतो, पण आपल्या प्रभागात झोपडय़ा वाढतात याची खंतही आपल्याला वाटायला हवी. प्रभागात झोपडय़ा उभ्या राहात असताना आपण गप्प का असतो, अशी विचारणाही यावेळी सभापतींनी केली. दरम्यान, राष्ट्र पुरुषांचे फलक लावून अशा प्रकारे किती झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत, याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही यावेळी प्रशासनाला देण्यात आला.