ठाणे जिल्ह्य़ातील लोकसंख्येच्या तुलनेत आधीच अत्यंत अपुरे जलस्रोत असल्याने भीषण पाणीसंकट उभे ठाकलेले असताना, या भागातील औद्योगिक वसाहतींमधील रासायनिक दूषित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदी-नाल्यांमध्ये सोडले जात असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानेच हरित लवादाकडे एका प्रतिज्ञापत्राद्वारे याची कबुली दिली आहे. ‘वालधुनीचे अरण्यरुदन’ या सविस्तर वृत्ताद्वारे शनिवारी ‘लोकसत्ता ठाणे’ने या विषयावर सविस्तर प्रकाशझोत टाकला आहे.
डोंबिवली-बदलापूर परिसरातील तीन औद्योगिक वसाहतींमध्ये सुमारे तीन हजार कारखाने आहेत. त्यातील रासायनिक कारखान्यांची संख्या तीनशेहून अधिक आहे. वैयक्तिकरीत्या कारखानदारांना सांडपाणी प्रक्रिया केंद्र राबविणे शक्य नसल्याने सामूहिकरीतीने हे प्रकल्प उभारण्यात आले. मात्र ते कधीच कार्यक्षमपणे चालत नसल्याचा पर्यावरणप्रेमींचा दावा होता. वेळोवेळी त्यांनी ही बाब प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनासही आणली होती. मात्र केवळ नोटिशीचे कागदी घोडे नाचविण्यापलीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे श्रीमलंग डोंगर रांगांमध्ये उगम पावून कल्याणच्या खाडीला मिळणारी वालधुनी नदीचे सांडपाण्याच्या मोठय़ा नाल्यात रूपांतर झाले. खाडीतले जलजीवन संपून ती मृत्युपंथाला लागली. इतकेच नव्हे तर शहरी भागातील पाणीपुरवठय़ाचा एकमेव स्रोत असणाऱ्या उल्हास नदीतील पाण्याची गुणवत्ताही खालावली. त्यामुळे या भागातील पर्यावरण आणि मानवी जनजीवन धोक्यात आले आहे. वनशक्ती या पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेने तीन वर्षांपूर्वी हा धोका ओळखून केंद्रीय हरित लवादाकडे तक्रार केली होती.
अंबरनाथ परिसरातील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात सांडपाण्यावर समाधानकारक प्रक्रिया होत नाही. डोंबिवली येथील प्रक्रिया केंद्रातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यातील प्रदूषकांचे प्रमाण दोन हजार मिलिग्रॅम प्रतिलिटर इतके अधिक आहे. प्रत्यक्षात प्रक्रियेनंतर हे प्रमाण २५० मिलिग्रॅम प्रतिलिटर इतके असायला हवे. हरित लवादाने दिलेल्या आदेशानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी जुलै-२०१५ पासून दर महिना डोंबिवली-अंबरनाथ परिसरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. अंबरनाथ येथील चिखलोली, आनंदनगर, डोंबिवली फेज-एक आणि दोन या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची पाहणी करून तेथील पाण्याचे नमुने तपासले. त्या पाण्याची गुणवत्ता योग्य नसल्याचे त्यांना आढळून आले.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात डोंबिवली-बदलापूर परिसरातील कोणत्याही केंद्रात सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याची कबुली देण्यात आली आहे. मंडळाच्या प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत मर्यादेपेक्षा दहापट अधिक प्रदूषित सांडपाणी नदी-नाल्यात सोडले जात असल्याचे आढळून येत आहे.
अश्विन अघोर, वनशक्ती