News Flash

प्रदूषण नियंत्रणाबाबत महापालिका उदासीन

वायू प्रदूषण चाचणी घेण्यासाठी सर्व शहरात स्वतंत्र अ‍ॅम्बिएन्ट एअर मॉनिटरिंग स्टेशन उभारण्याचे सुचवण्यात आले होते.

दोन वर्षांत वसई पालिकेकडून अहवालच नाही

वसई-विरार महापालिका ‘स्वच्छ आणि हरित वसई’चा नारा देत असली तरी प्रत्यक्षात शहरात प्रदूषण नियंत्रणासाठी काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून आले आहे. शहरातील प्रदूषणासंदर्भात महापालिकेने २०१४-१५ या वर्षांत तयार केलेल्या अहवालात प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना सुचवल्या होत्या. मात्र या उपाययोजनांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. प्रदूषण नियंत्रित करणारी उपकरणे, ती विकत घेण्यासाठी झालेल्या निविदेचे काय झाले याचीही माहिती महापालिकेकडे नाही. विशेष म्हणजे दरवर्षी प्रदूषणासंदर्भातील अहवाल तयार करणे आवश्यक असतानाही गेल्या दोन वर्षांत हा अहवाल तयार केला नसल्याचेही दिसून आले आहे.

हवेतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्व प्रमुख शहरांमध्ये हवा तपासणी केंद्र उभारणे बंधनकारक केले आहे. वातावरणातील प्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी पाच प्रदूषित घटकांची तपासणी करण्यात येते. त्यात सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साईड, अमोनिया, तरंगणारे धूलीकण आणि श्वसनाद्वारे शरीरात जाणारे तरंगणारे अतिसूक्ष्म अदृश्य धुलीकण आदींचा समावेश आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षांत महापालिकेने वसई-विरार शहरातील ३२ गर्दीच्या ठिकाणी ही वायुचाचणी केली होती. या चाचणी अहवालानंतर वसईतील एसओटू, एनओएक्स, एसपीएम, आरएसपीएम, सीओ आणि हायड्रोकार्बन यांची पातळी खूप जास्त असल्याचे आढळून आले होते. त्यात वसई रेल्वे स्थानक, नालासोपारा बस स्थानक, पेल्हार तलाठी कार्यालय, आचोळे या ठिकाणी एमपीएमचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले होते. या अतिसूक्ष्म कणांमुळे फुप्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. वयोवृद्ध लोकांना दम्यांचा त्रास वाढला आहे. याचा परिणाम प्राणी आणि झाडांवरही होत असल्याचे पालिकेच्या या अहवालात नमूद करण्यात आले होते. अचानक वाढलेले भूक्षेत्र विकास, वाहनांची वाढती संख्या, ऊर्जेच्या आणि वस्तूंच्या मागणीत वाढ झाल्यामुळे हे वायू प्रदूषण वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. शहरात अधिकाअधिक सीएनजी सेंटर उभारण्याची तरतूद होती. मात्र शहरात अद्याप एकही सीएनजी सेंटर नाही. वायू प्रदूषण चाचणी घेण्यासाठी सर्व शहरात स्वतंत्र अ‍ॅम्बिएन्ट एअर मॉनिटरिंग स्टेशन उभारण्याचे सुचवण्यात आले होते. याशिवाय वाहतूक कोंडीमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी अनेक तरतुदींची शिफारस करण्यात आली होती, पंरतु त्यांचीही अंमलबजावणी झालेली नाही.

कुठले यंत्र? कुठल्या निविदा?’

वायू तपासणीसाठी स्वतंत्र ‘अ‍ॅम्बिएन्ट एअर मॉनिटरिंग’ स्टेशन उभारण्याची निविदा महापालिकेने २०१४ मध्ये काढली होती. मात्र शहरात एकही अ‍ॅम्बिएन्ट एअर मॉनिटरिंग स्टेशन उभारण्यात आलेले नाही. या निविदेचे पुढे काय झाले त्याची माहिती विचारली असता तीही पालिकेकडे उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात लेखी कळवण्यात आले आहे. वसईतील माहिती अधिकार कार्यकर्ते चरण भट यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला असता महापालिकेची ही अनास्था समोर आली. महापालिकेने कुठल्या यंत्राच्या आधारे वायू प्रदूषणाची चाचणी केली, तीही पालिका सांगू शकत नसल्याचे ते म्हणाले. वायू प्रदूषणाबाबत सद्य:स्थिती अहवाल दरवर्षी करणे बंधनकारक असताना महापालिकेने दोन वर्षांपासून तो केला नसल्याचाही आरोप भट यांनी केला आहे.

महापालिकेला वायू प्रदूषणासंदर्भातील सद्य:स्थिती अहवाल बनवून त्यावर उपाययोजना करावी लागते. मागील दोन वर्षे हा अहवाल का तयार झाला नाही ते तपासले जाईल. आतापर्यंत काय उपाययोजना केल्या, निविदा आणि वायुचाचणी यंत्राचे काय झाले, त्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जाईल.

संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 1:53 am

Web Title: pollution control issue vasai municipal corporation
Next Stories
1 भाजपविरोधातील महायुतीचा प्रयोग यशस्वी
2 जुन्या ठाण्यातील रस्ते ‘जैसे थे’च?
3 टँकर गळतीमुळे नागरिकांना रसायनबाधा
Just Now!
X