News Flash

डोंबिवलीत प्रदूषणाची मोजदादच नाही!

महाराष्ट्रातील प्रदूषित शहरांच्या यादीत डोंबिवलीचा क्रमांक नेहमीच वरचा लागतो.

राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर असा बट्टा लागलेल्या डोंबिवली परिसरातील वाढत्या प्रदूषणाबद्दल सातत्याने तक्रारी येत असतात. काही वर्षांपूर्वी या भागात पडलेला हिरवा पाऊस संशोधकांसाठीही चिंतेचा विषय ठरला होता. मात्र, असे असतानाही डोंबिवलीतील प्रदूषण मोजण्याची प्रक्रिया दोन वर्षांपासून बंद आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोंबिवलीत प्रदूषणाची मोजमाप करणारी यंत्रणा बसवली; मात्र वीजपुरवठय़ाअभावी ही यंत्रणा सुरुवातीपासून बंद आहे. त्यातच महावितरणने ‘‘आम्ही वीजपुरवठा देण्यास तयार आहोत, पण प्रदूषण नियंत्रण मंडळ टाळाटाळ करत आहे,’’ असे उत्तर दिल्याने या दोन्ही सरकारी यंत्रणांच्या वादात प्रदूषणाचे यंत्र अडकून पडले आहे.

महाराष्ट्रातील प्रदूषित शहरांच्या यादीत डोंबिवलीचा क्रमांक नेहमीच वरचा लागतो. शहरास लागूनच असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रात प्रदूषणाचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याच्या या भागातील रहिवाशांच्या तक्रारी आहेत. नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा दबाव सातत्याने वाढू लागल्याने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दोन वर्षांपूर्वी निवासी भागातील सागांव येथील पिंपळेश्वर मंदिरात तब्बल दीड कोटी रुपये खर्चून प्रदूषण मोजमाप संयंत्र येथे बसविले. या यंत्रामुळे हवेतील तीन किमी परिसरातील वायू प्रदूषणाची मोजणी करता येऊ शकेल, असा दावा केला गेला. डोंबिवली परिसरातील प्रदूषणाची पातळी यामुळे तपासली जाईल, असाही नियंत्रण मंडळाचा दावा होता. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर डोंबिवली परिसरात दररोज किती प्रदूषण होते याची माहिती नागरिकांना ‘डिस्प्ले’च्या माध्यमातून मिळू शकेल, तसेच केंद्रीय प्रदूषण मंडळ व राज्य प्रदूषण मंडळाला याची माहिती दिली जाईल, असे दावेही करण्यात आले.

दोन वर्षांपूर्वी बसवण्यात आलेले हे यंत्र तेव्हापासूनच बंद आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वीजजोडणी मिळत नसल्याने हे यंत्र बंद आहे, असा तक्रारीचा सूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी लावत आहेत. यासंबंधी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण विभागाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. जितेंद्र संगेवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या विलंबाचा दोष महावितरणवर ढकलला. या यंत्रणेला वीजपुरवठा करण्यासंदर्भात महावितरणला काही हरकती आहेत. त्यामुळे हे काम आतापर्यंत रखडले होते, असा दावा त्यांनी केला. तर दुसरीकडे, महावितरणचे उपअभियंता सी.एम. साळवी यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीच टाळाटाळ करत असल्याचा प्रत्यारोप केला. ‘‘या यंत्रणेच्या ठिकाणी बसविण्यात येणारे मीटर तयार आहेत, परंतु मंडळाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार ते लावण्यास टाळाटाळ करत आहेत. आम्ही वीजपुरवठा करत नाही म्हणून प्रदूषण तपासण्यात अडचणी येत आहेत, असे म्हणणे साफ चुकीचे आहे,’’ असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2015 1:27 am

Web Title: pollution counting machine closed in dombivali
Next Stories
1 ठाण्याच्या पुढे शटल सेवा चालवा
2 दैनंदिन समस्यांवर वैज्ञानिक उत्तरे
3 झोपडपट्टीतील नळजोडण्यांवर पालिकेची कारवाई
Just Now!
X