धूपप्रतिबंधक बंधारे खचले; कोळशांच्या बोटींमुळे मच्छीमारांचे नुकसान; वाळूचोरीमुळे किनाऱ्यांना धोका

डहाणू तालुक्यातील किनारपट्टी भागातील गावे विविध समस्यांच्या विळख्यात असून प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. दिवादांडीचा संरक्षक धूपप्रतिबंधक किनारा खचल्याने किनारपट्टीवरील गावांची सुरक्षा धोक्यात आली आहे, त्याशिवाय बोंबील उत्पादक मच्छीमारांचे कोळशांच्या बोटींमुळे नुकसान होत आहे. वाळूचोरीच्या घटनाही वाढल्या असून त्यामुळे किनारे खोल बनत असून ग्रामस्थांच्या जिवाला धोका आहे.

दिवादांडीचा संरक्षक धूपप्रतिबंधक किनारा खचल्याने मांगेल वाडी, दिवादांडी, डहाणू खाडी नाका या गावांमध्ये समुद्राचे पाणी शिरते. त्याचा परिणाम किनाऱ्यालगत असणाऱ्या घरांवर, शेतीवर, वाडीवर होत आहे. किनारपट्टीवरील गावांमध्ये घरात, शेतीत पाणी शिरणे आता नित्याचेच झाले आहे. मात्र बंदरविकास खाते याकडे दुर्लक्ष करत आहे. तात्पुरती डागडुजी करण्याऐवजी धूपप्रतिबंधक किनाऱ्याचे पक्के बांधकाम करावे यासाठी सागरीसुरक्षा तटरक्षक दलाने सरकारकडे वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

डहाणू औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी कोळशाची वाहतूक करणाऱ्या बोटींमुळे मच्छीमारांना मोठय़ा नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी पारपंरिक पद्धतीने मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांची जाळी या बोटींमुळे तुटते. त्याशिवाय कोळसा पाण्यात पडून होणाऱ्या प्रदूषणामूळे अनेक मासे मृत्युमुखी पडत आहेत.

दिवादांडी किनाऱ्याला वाळूचोरीच्या समस्येने ग्रासले आहे. किनारपट्टीवर वाळूचोरी होत असल्यामुळे किनारे खोल होत चालले आहेत. खचलेल्या किनाऱ्यांचा अंदाज न आल्यामुळे मच्छीमार आणि पर्यटकांच्या जिवाला अनेकदा धोका निर्माण झाला आहे. किनाऱ्यावरील झाडे वाळूचोरीमुळे उन्मळू पडत आहेत. या सर्व समस्या दूर होण्यासाठी स्थानिक लोक सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र याकडे सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे.

डहाणूचा संरक्षक धूपप्रतिबंधक किनारा खचल्याने समुद्राच्या लाटा थेट किनाऱ्यावर कोसळतात. परिणामी प्रत्येक वर्षी किनारपट्टीच्या गावांना पुराचा सामना करावा लागत आहे. शासनदरबारी पत्रव्यवहार करूनही मच्छीमारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.   धनेश आकरे, मच्छीमार, डहाणू

समुद्र किनारपट्टीवरील वाढत्या वाळूचोरीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत.    राहुल सारंग, तहसीलदार डहाणू