शहरात वाहनांची संख्या रोडावली; बांधकाम, हॉटेल बंदमुळे वातावरणात बदल

नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रामधील हवा प्रदूषण रोखण्यासाठी सातत्याने उपाययोजना करूनही प्रशासनाच्या पदरी निराशा पडत असतानाच, टाळेबंदीमुळे वातावरणात मोठे बदल होऊन अनेक वर्षांनंतर शहरातील प्रदूषण निम्म्याने घटले आहे. यापूर्वी १०० टक्कय़ांपेक्षा जास्त असलेला शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक आता निम्म्याने कमी म्हणजे ५० टक्क्यांच्या आसपास आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रदूषणात प्रथमच इतकी मोठी घट झाली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले असून त्याचबरोबर शहरात वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे शहरातील प्रदूषणात गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. त्यातच बांधकाम प्रकल्पामुळेही प्रदुषणात भर पडत आहे. ठाणे महापालिका प्रशासनाने शहरात विविध ठिकाणी हवा गुणवत्ता मापन उपकरणे बसविली असून त्याद्वारे शहरातील हवा प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाकडमून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. या उपकरणाद्वारे शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक १०० टक्कय़ांपेक्षा जास्त असल्याचे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने समोर येत असून त्यामुळे शहराची हवा अत्यंत प्रदूषित असल्याचे चित्र होते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या टाळेबंदीमुळे ठाणे शहरात गेल्या महिनाभरापासून वाहनांची वर्दळ कमी झाली असून त्यामुळे शहरातील प्रदूषण कमी झाल्याची बाब काही दिवसांपूर्वी समोर आली होती. १०० टक्क्यांपेक्षा जास्त असलेला शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक ७२ टक्क्यांच्या आसपास आला होता. त्यापाठोपाठ आता शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक ५० टक्क्यांपर्यंत आला आहे.

हवेची गुणवत्ता मध्यम

ठाणे शहरातील तीन हात नाका, कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती कार्यालय या रहिवासी क्षेत्रात, तर रेप्टाकोस कंपनी या औद्योगिक क्षेत्रात हवा गुणवत्ता मापन उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्याद्वारे शहरातील हवेचे मापन दररोज केले जाते. त्यानुसार सर्वाधिक वर्दळीचा परिसर असलेल्या तीन हात नाका भागात हवेचा गुणवत्ता निर्देशांक यापूर्वी १५२ टक्क्यांपेक्षा जास्त होता. मात्र, आता तो ४६ टक्के आहे. तर नौपाडा, कोपरी आणि पोखरण परिसरात हवेचा गुणवत्ता गुणवत्ता निर्देशांक  ८० ते ९० टक्के इतका होता. मात्र, आता येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४७ ते ५६ टक्क्यांच्या आसपास आहे.

प्रदूषणाचे चौक

                          ठिकाण पूर्वी    आता

तीन हात नाका      १५२               ४६

नौपाडा प्रभाग        ९२                ५२

कोपरी प्रभाग          ७६               ५६

रेप्टाकोस कंपनी     ८३               ४७