बाराही महिने हवेची प्रतवारी वाईट

आधारवाडी कचराभूमीवर लागणाऱ्या आगी, औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांतून सोडले जाणारे वायू, वाहनांची वाढती वर्दळ अशा विविध कारणांमुळे कल्याण, डोंबिवली शहरांतील प्रदूषणाने वरची पातळी गाठण्यास सुरुवात केली आहे. प्रदूषित शहरांच्या यादीत नेहमीच आघाडीवर असलेली या दोन्ही शहरांतील हवेची प्रतवारी वर्षांचे बाराही महिने वाईट असल्याचे दिसून येते. त्यातही मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात आणि एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ातही कल्याणमधील हवेतील प्रदूषणाचा निर्देशांक २७४ अर्थात अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे.

कल्याणे, डोंबिवली शहरांतील औद्योगिक क्षेत्र, दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहतूक आणि बांधकामांमुळे शहरातील हवेची पातळी घसरत चालली आहे. या पट्टय़ात अनेक रासायनिक कारखाने असून तेथून बाहेर सोडले जाणारे वायू हवेत मिसळून हवेची गुणवत्ता ढासळवत आहेत. याबाबत गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणप्रेमी सातत्याने ओरड करत असतानाच, कचराभूमीवर लागणाऱ्या आगींनी शहरवासीयांची चिंता आणखी वाढवली आहे. मार्च महिन्यात आधारवाडी कचराभूमीला लागलेल्या आगीमुळे कल्याणच नव्हे तर डोंबिवलीतील प्रदूषणाची पातळी वाढल्याची माहिती हाती येत आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून या दोन्ही शहरांमधील हवामानाची पातळी नियमीतपणे मोजली जाते. डोंबिवली येथील पिंपळेश्वर मंदिर येथे हवेतील प्रदूषके मोजण्याची यंत्रणा कार्यान्वित असून त्यातून मिळणारी माहिती थेट संकेतस्थळावर पाठवली जाते. या माहितीनुसार, या दोन्ही शहरांमधील धुलिकणांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढले असून आधारवाडी कचराभूमीला लागलेल्या आगीमुळे प्रदूषणाची पातळी वाढली असल्याचे स्पष्ट होत आहे.

२ मार्च ते २७ मार्च या कालावधीत धुलिकणांसोबत हवेतील नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, अमोनियाचे प्रमाण पातळीपेक्षा वाढल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, त्यानंतरही हवेची प्रतवारी सामान्य नसल्याचे पर्यावरणतज्ज्ञांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.