19 April 2019

News Flash

पापलेटच्या मासेमारीवर संकट

आधुनिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांचे अतिक्रमण

|| नीरज राऊत

आधुनिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांचे अतिक्रमण; पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांच्या जाळय़ांत कमी मासे

मत्स्यआहारी खवय्यांचा आवडता मासा असलेल्या पापलेटच्या मासेमारीवर संकट आलेले आहे. मच्छीमारांना सर्वाधिक कमाई करून देणारे हे मासे कमी प्रमाणात जाळय़ात सापडत असून कव पद्धतीने (स्टिक नेट) मासेमारी करणाऱ्यांनी अतिक्रमण केल्याने पापलेटची मासेमारी धोक्यात आली आहे. राज्य शासनाने मासेमारीबाबत काही ठोस निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी न केल्यास पापलेट मासे दुर्मीळ होतील, अशी भीती मच्छीमारांनी व्यक्ती केली.

सातपाटी हे पश्चिम किनारपट्टीवरील पापलेटच्या मासेमारीसाठी प्रसिद्ध ठिकाणी असून येथूनच पापलेटची निर्याय होत असते. ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये मच्छीमार पापलेटची मासेमारी करतात. या माशाला बाजारात किंमत असल्याने मच्छीमारांना खूपच फायदा होतो आणि त्यांची वर्षभराची आर्थिक समस्या सुटते. मात्र अनेक समस्यांमुळे पापलेटची मासेमारी करणे पारंपरिक मच्छीमारांना कठीण झाले आहे. पारंपरिक मच्छीमार दालदा म्हणजे गिलेनेट पद्धतीने मासेमारी करतात. या पद्धतीत ५ ते ५.२५ इंच आस असलेल्या जाळय़ांनी मासेमारी केली जाते. या जाळय़ांमध्ये पूर्ण वाढ झालेले पापलेट मासे अडकतात आणि त्याचा मच्छीमारांना फायदा होतो. मात्र अनेक बडे मच्छीमार आणि अन्य भागांतून पालघरमध्ये मासेमारी करण्यास आलेले मच्छीमार मात्र कव आणि करली डोळ पद्धतीच्या मासेमारीचा वापर करतात. या पद्धतीत कमी आसाच्या जाळय़ांचा वापर केला जातो आणि त्यामुळे पापलेटच्या लहान पिल्लांचा मृत्यू होतो.

१५ मे ते २५ ऑगस्ट हा पापलेट माशांच्या प्रजननाचा काळ असतो. या काळात मच्छीमारांकडून पापलेटची मासेमारी केली जात नाही. मात्र बडे मच्छीमार याकडेही दुर्लक्ष करतात आणि प्रजननाच्या काळातच पापलेटची मासेमारी केली जाते. त्यामुळे पापलेटची संख्या घटली आहे, असा आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला आहे. या काळात पापलेटच्या मासेमारीवर र्निबध घालावे, अशी मागणी स्थानिक मच्छीमारांनी केली आहे.

ऑगस्ट महिन्यात मासेमारीसाठी गेलेले पालघरचे मच्छीमार खवळलेल्या समुद्रामुळे आणि बिघडलेल्या वातावरणामुळे परत आले. त्यांच्या जाळय़ात पापलेट मासे सापडले असते तर त्यांची ही फेरी वाया गेली नसती. मात्र हा मासा पुरेशा प्रमाणात मिळालाच नाही. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये एक टन आणि त्यापेक्षा अधिक पापलेट मिळण्याच्या आशेवर निघालेल्या बोटींना २०० ते ७०० किलो मासे मिळाले. अनेक बोटींचा तर फेऱ्यांचाही खर्च न निघाल्याने मासेमारी हंगामाच्या अखेरीस मच्छीमार कर्जबाजारी होण्याची भीती ‘सातपाटी सवरेदय फिशरमेन सहकारी सोसायटी’चे अध्यक्ष पंकज पाटील यांनी व्यक्त केली. या सोसायटीच्या १३५ बोटींनी गेल्यावर्षी ३०० टन पापलेट आणली होती. यावर्षी तीन फेऱ्यांमध्ये ७०० किलोंपेक्षा अधिक पापलेट मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले.

१ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान सर्वच प्रकारच्या मासेमारीवर शासनाने बंदी आणल्यास मत्स्यप्रजनन आणि त्यांची चांगल्या प्रकारे वाढ होऊ  शकेल. १०० ग्रामपेक्षा कमी वजनाचे पापलेट मारल्यास संबंधित मच्छीमारावर कारवाई करण्याचे धोरण अवलंबल्यास माशाची पूर्ण पैदास होऊ  शकेल आणि चांगला दर मिळून मच्छीमारांचे उत्पन्न वाढेल, असे सातपाटी मच्छीमार कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मेहेर यांनी सांगितले.

कव पद्धतीची मासेमारी म्हणजे काय?

कव मासेमारीच्या पद्धतीत २० फूट लांबीचे लाकडी किंवा लोखंडी खांब समुद्राच्या तळाला रोवतात. त्याला असलेल्या दोरांना आधारे पाण्याच्या प्रवाह किंवा उंचीप्रमाणे जाळी (डोल नेट) बांधून ही जाळी टांगती (अधांतरी) ठेवतात. पाण्यातील भरती-ओहोटीच्या प्रमाणे जाळ्यात अडकलेले मासे काढले जातात. तर गिलनेट किंवा दालदा पद्धतीमध्ये बोटीवर अडकवली जाळी पाण्याच्या प्रवाहसोबत सोडून बोटीच्या मागे ही जाळी वाहत येते. जाळी तरंगत ठेवण्यासाठी किंवा अधांतरी ठेवण्यासाठी फ्लोट आणि वजनाचा वापर केला जातो. तळाशी केल्या जाणाऱ्या मासेमारीला बॉटम गिलनेट तर अधांतरी केल्या जाणाऱ्या मासेमारीला सरफेस गिलनेट असे संबोधले जाते.

संकटाची कारणे

  • बोटींच्या संख्येवर नियंत्रण नसल्याने मासेमारीचा अतिरेक
  • दालदा मासेमारीकरिता खोल समुद्रात राखीव क्षेत्र नाही. कव पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांचे अतिक्रमण.
  • कमी आसाच्या जाळ्यामुळे लहान पिल्लांचा मृत्यू.
  • पापलेटच्या प्रजननाच्या वेळेत होणाऱ्या मासेमारीवर र्निबध घालण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष.
  • कव पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांची संख्या, बोटीवर जाळ्यांच्या संख्यांचा अभ्यास करून त्यावर नियंत्रण ठेवण्याची ठोस व्यवस्था नाही.

कव पद्धतीच्या जाळ्यांमुळे पापलेटच्या मासेमारीत मोठय़ा प्रमाणात अडथळा होत आहे. समुद्रात कव पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांचे अतिक्रमण, मच्छीमारांमध्ये उद्भवणारा वाद मिटवण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.    – पंकज पाटील, अध्यक्ष, सातपाटी सर्वोदय फिशरमेन सहकारी सोसायटी

First Published on September 11, 2018 12:35 am

Web Title: pomfret scarcity