पारंपरिक नक्षीकाम असलेल्या पाश्चिमात्य कपडय़ांना मागणी

सण-उत्सव आणि पारंपरिक वेशभूषा हे समीकरण आता बदलू लागले असून परंपरेला छेद देत झटपट तयारीसाठी आधुनिक वेशभूषेला तरुणाई अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे. यंदा नवरात्रीच्या खास वेशभूषेत मुलींसाठी ‘पाँचो’ने बाजी मारली असून ठाण्याच्या बाजारात पाँचो खरेदीला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसत आहे. नेहमीच्या घागरा-चोलीपेक्षा पाँचो ड्रेस सोईस्कर ठरत असल्याने कार्यालयीन महिलांना गरबा खेळण्यासाठी ही वेशभूषा अधिक शोभून दिसत आहे. विशेष म्हणजे या पाँचो ड्रेसला पारंपरिक नक्षीकामाची जोड असल्याने ही इंडो-वेस्टर्न फॅशन यंदा बाजारात रुळू लागली आहे.

आधुनिक जीवनशैली आत्मसात केली असली तरी भारतीय सण-उत्सव साजरे करताना अनेक तरुण-तरुणींमध्ये ‘जुनं ते सोनं’ असे म्हणत पारंपरिक वेशभूषेलाही तेवढेच महत्त्व असते. नव्या फॅशनमध्येही पारंपरिकतेचा साज शोधण्याचा प्रयत्न तरुणांकडून केला जातो. सध्या चर्चेत असलेला पाँचो या वेशभूषेतही पारंपरिक कलाकुसरीचा प्रयत्न केला आहे. सुती कपडय़ात असल्याने वजनाने हलका आणि परिधान करण्यासाठी सोईस्कर असलेल्या पाँचो’ला याच कारणामुळे अधिक मागणी मिळत आहे. याशिवाय क्रॉप टॉप्ससोबत घागरा, स्कर्ट्स, पलाझो, रेशमी धाग्याने विणलेल्या कपडय़ांना मोठय़ा प्रमाणात बाजारात मागणी आहे. ठाण्यातील मोठय़ा कपडय़ांच्या दुकानात तसेच कमी किमतीत बाजारात पाँचो खरेदी करण्यासाठी महिला-मुली गर्दी करत आहेत. लांब घेराचा घागरा परिधान करून नृत्य करण्यासाठी हा पाँचो सोईस्कर ठरतो. साधारण ड्रेसवर गळ्यापासून हाताच्या पंजापर्यंत ओढणीच्या कपडय़ावर बांधणीचे नक्षीकाम केलेले आहे. ही ओढणी ड्रेसला जोडलेली असल्याने नृत्य करताना ओढणी सावरण्याचा अडथळा दूर होतो. एक हजारात साधे पाँचो तसेच पाच हजारापासून हाताने विणलेले जरदोसी कलाकुसर केलेले पाँचो ठाण्याच्या बाजारात उपलब्ध होत आहेत.

दरवर्षी नवीन काहीतरी फॅशन बाजारात येत असते. महिला-मुलींनाही पारंपरिक वेशभूषेत नवीन साज हवा असतो. यंदा पाँचो ड्रेस महिलांमध्ये अधिक पसंतीस पडत आहे. आधुनिक फॅशन आणि महिलांची सोय लक्षात घेऊन हे पाँचो तयार करण्यात आले आहेत.

अमित कारिया, कलानिधी