वर्षभरापूर्वी दुरुस्ती केलेल्या उड्डाणपुलावर मोठे खड्डे; बांधकामाच्या लोखंडी सळ्या उखडून रस्त्यावर; ४ कोटी ४६ लाख ७५ हजार ५४० रुपये खड्डय़ात

चार महिन्यांहून अधिक काळ अहोरात्र दुरुस्ती करूनही नव्या कोऱ्या मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याची अवघ्या वर्षभरातच दुरवस्था झाली असून या मार्गावरील ठाणे दिशेकडील उड्डाणपुलावरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याने वर्षभरापूर्वी झालेल्या कामाच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. येथील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून बांधकामाच्या लोखंडी सळ्या उखडून वर आल्यामुळे या ठिकाणी पुन्हा अवजड वाहनांची कोंडी होऊ लागली आहे.

बाह्य़वळण मार्गाच्या विविध कामांसाठी ४ कोटी ४६ लाख ७५ हजार ५४० रुपये खर्च करूनही या रस्त्याची दुरवस्था कायम असल्याने प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उरण येथील जेएनपीटी बंदरातून मुंबई, ठाणे, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरून सुरू असते. या मार्गावरील पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याची बाब पुढे येताच गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या अखेरीस येथील कामास सुरुवात करण्यात आली. दुरुस्तीच्या काळात शहरातील इतर भागांतून वाहतूक वळवण्यात आल्यामुळे याचा ताण वाहतुकीवर येऊन मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई भागांत मोठी कोंडी झाली होती. मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या दुरुस्तीनंतर सुखकर प्रवास होईल, अशी आशा प्रवासी व्यक्त करत होते. मात्र दुरुस्तीनंतर वर्षभरातच नागरिकांच्या या आशेवर पाणी फिरल्याचे दिसून आले आहे. मुंब्रा बाह्य़वळण मार्ग हा ६ किलोमीटर अंतराचा आहे. यापैकी पुलाचा भाग ६०० मीटर आहे. या संपूर्ण पुलावर जागोजागी खड्डे तयार झाले आहेत. रस्त्याच्या खालील भागातील बांधकामाच्या लोखंडी सळ्या उखडून वर आल्या आहेत. पुलांच्या सांध्यांच्या ठिकाणी जुळणीचे नटबोल्टही उखडून वर आले आहेत. तसेच पुलाचा बराचसा भाग उंच-सखल झाला आहे. ठाण्याहून मुंब्य्राच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंब्य्राहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या ठाणे दिशेकडील उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकांवरील रस्त्याची अशी बिकट अवस्था पाहायला मिळत असून या भागात अपघात होण्याची दाट शक्यता गेल्या काही दिवसांपासून वाहनचालकांकडून वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक संथगतीने सुरू असून या मार्गावर वाहतूककोंडीही होत आहे. उड्डाणपुलाशिवाय बाह्य़वळणावर अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभागीय अभियंता आशा जठाळ यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही संपर्क होऊ शकला नाही.

महत्त्वाचा मार्ग

उरण येथील जेएनपीटी बंदरातून मुंबई, ठाणे, भिवंडी आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक मुंब्रा बाह्य़वळण मार्गावरून सुरू असते. बाह्य़वळण मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या जड-अवजड वाहनांची संख्या लाखोंच्या घरात आहे, तर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हलक्या वाहनांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या मार्गाची दुरवस्था झाल्यामुळे या भागात गेल्या काही दिवसांपासून वाहतूककोंडीही होत असल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले आहे.

वॉटरप्रूफ मेमब्रेन्सतंत्रज्ञान पाण्यातच

मुंब्रा बाह्य़वळण मार्गाच्या पुलावर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडून दुरवस्था झाली होती. पावसाळ्यात पुलावर साचणारे पाणी पुलाच्या खालील भागात झिरपत असते. यावर उपाययोजना म्हणून दुरुस्तीच्या काळात ‘वॉटर प्रूफ मेमब्रेन्स’ हे तंत्रज्ञान वापरून पुलावर डांबरीकरण करण्यात आले होते. जेणेकरून पुलावर साचणारे पाणी न झिरपता पुलावरील विसर्ग वाहिन्यांतून बाहेर टाकले जाईल. मात्र आता पुलावरील रस्त्याचा भाग उंचसखल झाल्यामुळे रस्त्यावर साचणारे पाणी विसर्ग वाहिन्यांच्या दिशेने न जाता ते रस्त्याच्या मधोमध साचत आहे. त्यामुळे ‘वॉटर प्रूफ मेमब्रेन्स’ तंत्रज्ञान अक्षरश: पाण्यातच फसल्याचे पाहायला मिळत आहे.