गरम पाण्यासाठी नागरिकांकडूनच विजेची किटली, गिझर खरेदी

नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : भायंदरपाडा भागातील विलगीकरण कक्षाला महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी नुकतीच भेट देऊन राज्यातील आदर्श विलगीकरण कक्ष असल्याचा दावा केला होता. मात्र, या विलगीकरण कक्षात पिण्यासाठी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे येथील नागरिक नातेवाईक किंवा मित्रांमार्फत विजेची किटली आणि गिझर खरेदी करून त्याचा वापर करू लागले आहेत. गरम पाणी मिळावे यासाठी सातत्याने आग्रह धरूनही उपलब्ध होत नसल्याचे या कक्षातील नागरिकांचे म्हणणे आहे.

करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेली व्यक्ती अतिजोखमीच्या म्हणून गणल्या जातात. या अतिजोखमीच्या व्यक्तींना करोनाची लागण होण्याची दाट शक्यता असते आणि अशा व्यक्तींमुळे परिसरात करोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून अतिजोखमीच्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्याची कारवाई करण्यात येते. अशा व्यक्तींसाठी महापालिका प्रशासनाने भायंदरपाडा येथे विलगीकरण कक्षाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांच्या मुद्दय़ावरून महापालिका प्रशासन टीकेचे धनी ठरत आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी नुकताच या विलगीकरण कक्षाचा दौरा करून याठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या सुविधेबाबत समाधान व्यक्त केले होते. त्याचबरोबर राज्यातील आदर्श विलगीकरण कक्ष असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात मात्र याठिकाणी परिस्थिती वेगळी असून येथील नागरिकांना गरम पाण्याची सुविधा अजूनही मिळत नसल्याचे चित्र आहे.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गरम पाणी पिण्याचे आवाहन राज्य शासनाकडून केले जात असले तरी या विलगीकरण कक्षातील नागरिकांना महापालिकेकडून पिण्याच्या पाण्याचे बाटले उपलब्ध करून दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर श्रमिक जनता संघाचे सचिव जगदीश खैरालिया यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विलगीकरण कक्षात गरम पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ही मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. गरम पाणी मिळवण्यासाठी नागरिकच आता विजेची किटली आणि गिझर खरेदी करून त्याचा वापर करत आहेत, अशी माहिती येथील एका नागरिकाने दिली.

आंघोळीसाठी वापर..

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे विलगीकरण कक्षातील नागरिक आंघोळीसाठी विजेची किटली आणि गिझरद्वारे पाणी गरम करून त्याचा वापर करीत आहेत, असेही एका नागरिकाने सांगितले.