आडवारी भरवलेल्या प्रदर्शनाकडे वाचकांची पाठ
एरव्ही छोटय़ा सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमांनाही खच्चून गर्दी करणाऱ्या ठाणेकरांनी जांभळी नाक्याजवळील शिवाजी मैदानात भरलेल्या ग्रंथोत्सवाकडे मात्र सपशेल पाठ फिरवली. विविध साहित्य प्रकारांतील पुस्तकांचे प्रदर्शन, वाचन संस्कृतीविषयक विचारमंथन, साहित्यिकांचे परिसंवाद असा कार्यक्रम असलेल्या या या तीन दिवसांच्या ग्रंथोत्सवाला साहित्यप्रेमींची खूपच कमी हजेरी लागली. सुटीच्या दिवशी ग्रंथोत्सव भरवण्याऐवजी आडवारी भरवल्यामुळेच वाचकांची उपस्थिती रोडावल्याची प्रतिक्रिया उपस्थितांकडून उमटत आहेत.
नवीन पुस्तकांची वाचकांना ओळख व्हावी. तसेच वाचक आणि साहित्यिक यांच्यात संवाद घडावा यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्ममाने २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत ग्रंथोत्सव २०१५ च्या अंतर्गत भव्य ग्रंथप्रदर्शन आणि साहित्यिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी, महापौर यांच्या उपस्थितीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उत्सवाचे उत्साहात उद्घाटन झाले. पण अयोग्य वेळेच्या नियोजनामुळे नागरिकांच्या तुडुंब गर्दीची अपेक्षा असणारा ग्रंथोत्सव अयशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. अशा साहित्यिक मेळाव्याला ज्येष्ठ नागरिक मंडळी आवजून हजर असतात. मात्र, अशा कार्यक्रमांना तरुणांचीही उपस्थिती लाभावी, म्हणून काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्याकडेही तरुणांनी पाठ फिरवली.
स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या कायदेविषयक, शेअर बाजार, भूमीसंपादन, पोलीस भरती, सरकारी नोकरीचा मार्गदर्शक अशी उपयोगी पुस्तके प्रदर्शनात होती. मात्र, वाचकांना आकर्षित करणारी, त्यांना निखळ वाचनानंद देणाऱ्या पुस्तकांचे प्रमाण प्रदर्शनात खूप कमी होते. त्याचाही प्रदर्शनाला फटका बसल्याचे बोलले जाते. त्यातच हा उत्सव मंगळवार ते गुरुवार अशा कामाच्या दिवशी भरवण्यात आल्याने सुटीच्या दिवशी होणारी गर्दीही या महोत्सवाला लाभली नाही.

ग्रंथोत्सव होत असलेल्या काळात परीक्षा असल्याने विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती कमी दिसून आली. यंदाचे ग्रंथोत्सवाचे पहिलेच वर्ष होते. यापुढे दिवाळीच्या सुट्टीत ग्रंथोत्सव आयोजित करण्यासाठी प्रयत्न करु.
– अरविंद ढोणे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी

एखादी प्रसिध्द व्यक्ती कार्यक्रमात रसिकांना हवी असते अशी लोकांची मानसिकता झालेली आहे, त्यामुळे ग्रंथोत्सवात लोकांचा प्रतिसाद कमी दिसला असावा.
– सतीश चाफेकर, ठाणे</strong>