News Flash

पेट टॉक : लोकप्रिय पग श्वान

मध्यंतरी दूरचित्रवाणीवर एका जाहिरातीमध्ये ‘श्वान ब्रीड' मोठय़ा प्रमाणात लोकप्रिय झाले

पेट टॉक : लोकप्रिय पग श्वान
मध्यंतरी दूरचित्रवाणीवर एका जाहिरातीमध्ये ‘श्वान ब्रीड' मोठय़ा प्रमाणात लोकप्रिय झाले

मध्यंतरी दूरचित्रवाणीवर एका जाहिरातीमध्ये ‘श्वान ब्रीड’ मोठय़ा प्रमाणात लोकप्रिय झाले. या श्वानाच्या केवळ हालचालींवरून जाहिरातदाराचा संदेश ग्राहकांपर्यंत पोहचत होता. जाहिरातीसाठी समर्पक ठरलेले हे श्वान ब्रीड होते पग. या जाहिरातीनंतर पग श्वानाला मोठय़ा प्रमाणात पसंती मिळाली. अत्यंत लहान आकाराचे हे पग मूळचे चीनमधील आहेत. सोळाव्या शतकात पग हे श्वान ब्रीड चीनमधून युरोपला नेण्यात आले. १९ व्या शतकात हे पग ब्रिटनमध्ये आल्यावर या श्वानांची लोकप्रियतेकडे वाटचाल सुरू झाली. चीन देशातील पूर्वीच्या राजांचा पग हा आवडता पाळीव प्राणी होता. राजांसाठी पग हे श्वान ब्रीड राजवाडय़ांमध्ये पाळले जायचे. या श्वानांची विशेष काळजी घेतली जायची. त्या काळात हे पग एवढे लोकप्रिय होते की श्वानांच्या रक्षणासाठी सैनिकांची नेमणूक करण्यात आली होती. राणी व्हिक्टोरियाकडे हे श्वान आल्यावर त्यांनी मोठय़ा प्रमाणात पग श्वान ब्रीड नावारूपाला आणले. १८७३ मध्ये लंडनमधील केनेल क्लबमध्ये या श्वानांची नोंदणी झाली. २१ व्या शतकात ‘डॉग शो’ना सुरुवात झाल्यावर पग श्वान ब्रीड जगभरात लोकप्रिय झाले. सिंगापूर, थायलंड, जपान, इंडोनेशिया या देशांमध्ये या श्वानांचा अधिक प्रसार झाला. साधारणत: तीस ते चाळीस वर्षांपूर्वी हे ब्रीड भारतात आले. त्यावेळी पग हे फार कमी पाळले जायचे. उच्चभ्रू लोकांची प्रतिष्ठेची ओळख म्हणून पग या श्वानांची ख्याती होती.
हाताळण्यास सोपे
इतर श्वानांपेक्षा पग हे आकाराने लहान असल्याने घरात पाळणे सोयीचे असते. रागीट स्वभाव नसल्याने कोणत्याही ठिकाणी हे श्वान मिसळतात. आहार यांचा बेताचा आहे. त्यामुळे पग हे श्वान हाताळण्यास सोपे आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण पग श्वानाला योग्यरीत्या हाताळू शकतात.
भारतात सर्वच शहरात मोठय़ा प्रमाणावर या श्वानांचे ब्रीडिंग होते. अलीकडे जास्त ब्रीडिंग होत असल्याने कमी किमतीत पग हे श्वान ब्रीड उपलब्ध होतात. सर्दी कफसारखे आजार होण्याची शक्यता असल्याने पग या श्वानांना ओल्या जागेपासून दूर ठेवावे लागते. या श्वानांना कोरडय़ा आणि मोकळ्या जागेत ठेवावे लागते. पग यांचे नाक चपटय़ा आकाराचे असल्याने आतील बाजूस नाकाची रचना इतर श्वानांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे त्यांना सर्दी किंवा कफसारखे आजार उद्भविण्याची शक्यता असते. या श्वानांना उद्भविणाऱ्या आजारांमुळे पग श्वानांना अनेक एअरलाइन्सकडून प्रवासासाठी नाकारण्यात आले आहे.
चपळ, खेळण्याची आवड
पग हे श्वान कोणत्याही वातावरणात स्वत:ला सामावून घेऊ शकतात. मुळात या श्वानांच्या अंगी चपळता असते. सतत खेळणे यांना आवडते. मात्र मालकाच्या स्वभावानुसार वागण्यात हे कमालीचे हुशार असतात. मालक चिडलेला असेल तर हे शांत राहतात. याउलट मालक यांच्यासोबत खेळत असेल तर ते त्याला तेवढाच उत्तम प्रतिसाद दिला जातो.
इतर मोठय़ा श्वानांप्रमाणे पग श्वान कुणाला चावण्याची भीती नाही. प्रेमळ स्वभावाचे हे पग ओळखले जातात. आहारात या श्वानांना बाजारातील तयार पदार्थ दिले जात असले तरी घरचे जेवणही हे श्वान खाऊ शकतात. फक्त ज्या पदार्थामुळे कफ, सर्दी होण्याची शक्यता असते, असे पदार्थ या श्वानांना देऊ नयेत.
जास्त वजन आरोग्यास हानिकारक
या श्वानांचे वजन साधारण दहा ते अकरा किलो एवढे असते. मात्र त्यापेक्षा वजन वाढू न देण्यासाठी मालकास काळजी घ्यावी लागते. यासाठी दररोज फिरायला घेऊन जाणे, खेळण्यास उत्तेजित करणे यांसारखे व्यायाम या श्वानांकडून करवून घेणे आवश्यक असते. योग्य आहार आणि व्यायाम, सर्दी कफपासून रक्षण अशी काळजी घेतल्यास या श्वानांचे आयुष्य अकरा ते बारा वर्षांपर्यंत असते.
हाताळण्याच्या पट्टय़ाची योग्य निवड मालकास करावी लागते. बऱ्याचदा छातीचे पट्टे या श्वानांना हाताळण्यासाठी वापरले जातात. मात्र या पट्टय़ांमुळे शरीर घट्ट आवळले गेल्यामुळे त्यांना त्रास होतो. यासाठी मानेलगत बांधले जाणारे पट्टे वापरल्यास या श्वानांच्या दृष्टीने सोयीस्कर ठरते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2016 5:11 am

Web Title: popular pug dog
Next Stories
1 सांस्कृतिक विश्व : मनातल्या भावकल्लोळांचे सुरेल शब्दचित्र
2 झोपडीमुक्तीसाठी एका वर्षांत सर्वेक्षण पूर्ण करणार!
3 बेशिस्त रिक्षा चालकांवर ‘ईगल ब्रिगेड’ची कारवाई
Just Now!
X