|| जयेश सामंत-नीलेश पानमंद

वाहतूक सुधारणा, जलवाहतुकीसारख्या लोकप्रिय योजनांचा मोह आवरता; पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफीही नाही

ठाणे : पुढील वर्षी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चार वर्षांत आखलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उभारणीचे चित्र ठाणेकरांसमोर मांडण्याचे सत्ताधारी शिवसेनेचे स्वप्न महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी धुळीस मिळवले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याचे स्पष्ट करतानाच आयुक्तांनी वास्तवदर्शी अर्थसंकल्प मांडण्यावरच भर दिला. त्यामुळे तीन हात नाका येथील वाहतूक सुधारणा, जलवाहतूक, श्रीनगर ते गायमुख नवा रस्ता, येऊर पर्यटन स्थळाचा विकास, समूह विकास योजनेसाठी संक्रमण शिबिरांची उभारणी अशा तत्कालीन पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या घोषणा कागदावर आणण्याचे धाडसही डॉ. शर्मा यांनी दाखवलेले नाही. त्यामुळे निवडणुकीत अशा प्रकल्पांच्या शिदोरीवर बाजी मारण्याच्या राजकीय पक्षांच्या योजनांना धक्का बसला आहे.

चार वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकांना सामोरे जात असताना ठाणे महापालिका हद्दीतील पाचशे चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याची घोषणा शिवसेना नेत्यांनी केली होती. पुढे यासंबंधीचा ठरावही सर्वसाधारण सभेत करण्यात आला. ही करमाफी राज्य सरकारच्या संमतीशिवाय शक्य नसल्याने तत्कालीन आयुक्तांनी या ठरावास फारर्शी किंमत दिली नाही. करोनाकाळामुळे एकूणच उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात शिवसेनेला अपेक्षित असलेल्या करमाफीचा उल्लेखही आयुक्तांनी केला नसला तरी सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे पदाधिकारी यावर कोणता निर्णय घेतात हे पाहाण्यासारखे ठरणार आहे. कमकुवत आर्थिक परिस्थितीमुळे महापालिका प्रशासनाने यापूर्वी घोषणा झालेले मात्र कागदावरच असलेल्या प्रकल्पांना कात्री लावली आहे. जुन्या प्रकल्पांच्या पूर्ततेवर भर देताना आयुक्तांनी कोणतेही स्वप्नरंजन करण्याचे टाळले आहे.

गेल्या काही वर्षांत सातत्याने ज्या प्रकल्पांची घोषणा व चर्चा करण्यात येत होती, त्यातील अनेक प्रकल्पांना आयुक्तांनी हातही लावलेला नाही. पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली की नवीन प्रकल्प हाती घेता येतील, असे सूतोवाच मात्र त्यांनी केले.

हे प्रकल्प किमान वर्षभर बासनात?

छत्रपती शिवाजी मंडई पुनर्बांधणी, तरणतलाव बांधकाम आणि नूतनीकरण, मनोरुग्णालय परिसरात क्रीडा संकुल उभारणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना, बीएसयूपी संलग्न स्थापत्य आणि विद्युत कामे, वाडिया रुग्णालय नूतनीकरण, ओवळा बस आगार, शाळांना संरक्षक भिंत बांधणे, मिनी मॉल बांधणे, क्लस्टर संक्रमण शिबीर बांधणे, लोकमान्यनगर बस आगार विकसित करणे, स्वा. सावरकर स्मृती स्तंभ, नर्सिंग पदवी महाविद्यालय इमारत बांधणे, वागळे इस्टेट बहुमजली वाहनतळ, फूड प्लाझा बांधणे, मिनी स्पोट्र््स कॉम्पलेक्स विकास, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज व सपोर्ट सेंटर, विद्यापीठ बांधकाम, ठाणे पश्चिम स्थानक परिसर सुधारणा, एलबीएस रोड पादचारी पूल, ट्रेन्चलेस पद्धतीने नाला प्रवाह जोडणे, घोडबंदर सेवा रस्ते, कळवा रेल्वे स्थानक परिसर सुधारणा, खारेगाव ते कळवा पूर्व रस्ता रुंदीकरण, पीआरटीएस, दातिवली रेल्वे स्थानक परिसर सुधारणा, सार्वजनिक बांधकाम आपत्कालीन कामे, कोपरी खाडीकिनारा विकास व पिकनिक सेंटर.