महेश काळेंच्या मैफलीला हजारो रसिकांची दाद 

शास्त्रीय आणि नाटय़संगीताच्या पारंपारिक शैलीला नाविन्य आणि आधुनिकतेची जोड देत नव्या पिढीलाही त्या निरागस सुरांवर प्रेम करायला लावणारे नव्या पिढीचे लोकप्रिय गायक महेश काळे यांनी त्यांच्या लौकिकाला साजेशी बहारदार मैफल सादर करून ‘शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल’चा दुसरा दिवस गाजविला. हजारो रसिकांच्या उपस्थितीत महादेव स्तुतीने आपल्या गायनाची सुरूवात करणाऱ्या महेश काळेंनी त्यानंतर ‘सुर निरागस हो’च्या तार सप्तकातील आलापीने रसिकांची मने जिंकली. ‘लोकसत्ता’ या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहे.

‘म्युझिकली युवर्स’ या त्यांच्या मैफलीची सुरूवात ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ ने झाली. त्यानंतर अनिरूद्ध जोशी या युवा गायकाने ‘माझे माहेर पंढरी’ हे भक्तीगीत तर प्रल्हाद जाधव यांनी ‘अग नाच नाच नाच राधे उडवूया रंग’ ही गवळण सादर केली.

त्यानंतर मैफलीचा ताबा महेश काळे यांनी घेतला. ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ कानडा राजा पंढरीचा, तू ही रे तेरे बिना मै कैसे जिऊ अशी एकापेक्षा एक सरस गाणी सादर करून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. शास्त्रीय संगीताला हार्मोनियम, तबला या पारंपरिक वाद्यांबरोबरच गिटार, की-बोर्ड, ड्रम आदी इलेक्टॉनिक्स वाद्यांची जोड देत त्यांनी फ्यूजन संगीत सादर केले. रसिकांच्या आग्रहाखातर ‘सूर निरागस हो’पुन्हा एकदा गाऊन त्यांनी मैफलीचा समारोप केला. संगीत संयोजन मिथिलेश पाटणकर यांनी केले. त्यांना रितेश ओव्हाळ (गिटार), राजीव तांबे (हार्मोनियम), विभव खांडोळकर (तबला), विजय तांबे (बासरी), प्रभा मोसमकर (पखवाज), सूर्यकांत सुर्वे (साईड ऱ्हिदम), अभिजीत भदे (ड्रम) यांनी साथ दिली.

‘फेसबुक’वरून हजारो लाइव्ह फर्माईशी

पारंपारिक संगीताला आधुनिकतेचा साज चढविणाऱ्या महेश काळे यांनी मैफलीदरम्यान रंगमंचावरील पडद्यावर त्यांचे फेसबुक पेज झळकावून रसिकांना थेट फर्माईशी पाठविण्याचे आवाहन केले. उपस्थित रसिकांनी त्याला जोरदार प्रतिसाद देत अवघ्या दहा मिनिटात साडेसहाशे फर्माईशी पाठविल्या. पुढील काही मिनिटांमध्ये फर्माईशींची संख्या हजारांवर पोहोचली.

उत्स्फुर्त प्रतिसाद

हजारो रसिकांनी महेश काळेंच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. रसिकांची संख्या इतकी प्रचंड होती की मंडपातील खुर्च्या अपुऱ्या पडल्या. तेव्हा उभे राहून मैफलीचा आनंद घेणाऱ्या रसिक श्रोत्यांना पुढे येऊन बसण्याची विनंती महेश काळे यांनी केली.

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार

शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांची उपस्थिती हे शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवसाचे वैशिष्टय़ ठरले. त्यांच्या हस्ते महेश काळे आणि इतर गायक कलावंतांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी फेस्टिव्हलचे आयोजक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले. ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, महोत्सवाचे संयोजक अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी आदी याप्रसंगी उपस्थित होते.