पालिकेच्या मुख्यालयासमोरील रस्त्यांची दुरवस्था; पालकमंत्र्यांचे आदेशही धाब्यावर

रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे आतापर्यंत पाच प्रवाशांचा बळी जाऊनही कल्याण- डोंबिवली महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही. कल्याण येथील महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी दूर व्हावी यासाठी मुख्यालयास लागूनच असलेल्या रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याचे आदेश मध्यंतरी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र, त्यानंतरही मुख्यालयासमोरील खड्डे ‘जैसे थे’ आहेत.

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्याची कामे वेगवेगळ्या यंत्रणांनी हाती घेऊन महिना उलटला आहे. तरीही अनेक रस्ते खड्डेग्रस्त आहेत. यंदा जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खड्डय़ांचे प्रमाण वाढले आहे. कल्याण-डोंबिवली शहरात जुलै महिन्याच्या पावसात पडलेले खड्डे बुजविण्यात महापालिका प्रशासनाला यश आलेले नाही. त्यात पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे खड्डय़ांची संख्या वाढू लागली आहे. महापालिका आयुक्त गोंविद बोडके यांनी मध्यंतरी खड्डे बुजविण्यासाठी अभियंत्यांची शनिवार, रविवारची सुटी रद्द केली. त्याचाही फारसा परिणाम झालेला नाही. कल्याण-डोंबिवलीतील खड्डय़ांमुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना होत असलेला त्रास आणि सातत्याने होऊ  लागलेल्या अपघातांमुळे रस्त्यांची कामे करणाऱ्या सर्व सरकारी यंत्रणा टीकेच्या धनी ठरल्या आहेत.

दरम्यान, कल्याण येथील महापालिका मुख्यालयासमोरील महत्त्वाचा रस्ताही खड्डय़ांमुळे शरपंजरी पडला आहे. शिवाजी चौकातून रेल्वे स्थानकाच्या दिशेने ये-जा करण्यासाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे येथे नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. खड्डय़ांमुळे येथे प्रवाशी खोळंबू लागल्याने मध्यंतरी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील खड्डे तातडीने बुजवा असे आदेश दिले. मुख्यालयासमोरच असे खड्डे असतील तर कसे चालेल या शब्दांत पालकमंत्र्यांनी संबंधितांना खडसावले. महापालिकेत सत्तापदी शिवसेना असल्याने पालकमंत्र्यांचे आदेश गांभीर्याने घेतले जातील, अशी कल्याणकरांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र या आदेशानंतरही हे खड्डे जैसे थे असल्याचे चित्र आहे.

खड्डय़ांचे प्रमुख चौक

शिवाजी चौक, खडकपाडा चौक, अहिल्यादेवी चौक, आधारवाडी चौक, बिर्ला महाविद्यालय रस्ता, अग्रवाल महाविद्यालय रस्ता, हाजिमलंग रोड, तसेच डोंबिवलीतील इंदिरा गांधी चौक, द्वारका हॉटेल चौक, टंडन रोड असे शहरातील अंतर्गत भागात असंख्य खड्डे आहेत.

पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार खड्डे बुजविण्याची कामे हाती घेण्यात आली असली तरी सतत पडणाऱ्या पावसामुळे यामध्ये व्यत्यय येत आहे. पाऊस उघडताच हे खड्डे भरले जातील.

-प्रसाद ठाकूर, जनसंपर्क अधिकारी कल्याण-डोंबिवली महापालिका