वसईत भात कापणीला सुरुवात

मुसळधार पावसामुळे जुलै महिन्यात वसईत पूर आला असला तरी त्यानंतर पावसाने दडी मारली. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून भातपिकावर विपरीत परिणाम झाला आहे. वसई तालुक्यातील भात कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र कमी पावसामुळे यंदा उत्पादन घटण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. भाताच्या ओंब्या भरल्या नसल्याने यंदा शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

वसई तालुक्यात शेतकऱ्यांना भातशेतीमधून अधिक उत्पन्न मिळते. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्याने भातशेती संकटात आली आहे. यंदा पुरेशा प्रमाणात भाताचे उत्पादन झालेले नाही. काही शेतकऱ्यांचे तर घरच्या वापरासाठीही भात उत्पादन झाले नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे भात उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे प्रशासनानेही पाठ फिरवली आहे. प्रशासनाच्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र ती न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

आदिवासी एकता परिषदेचे दत्ता सांबरे यांनी याबाबत सांगितले, योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता कोरडा दुष्काळच पडला आहे. जवळपास आता ४० टक्केही उत्पादन निघणे मुश्कील झाले असून लावणी, कापणी यासाठीचा खर्चही यातून निघणार नाही. यासाठी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची प्रशासनाकडून भरपाई मिळावी यासाठी आम्ही वसईच्या तहसीलदारांना निवेदनपत्र सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षीही शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा आहे त्या परिस्थितीत कापणीला सुरुवात केली आहे. मात्र यंदा उत्पादनात खूप घट झाली आहे. त्यामुळे खर्चही वाढला आहे.

– वैभव डुकले, शेतकरी

गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना मदतनिधी वाटप करण्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे. यंदा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना आल्या नाहीत, तसेच तालुक्यातील शेतीची परिस्थिती लक्षात घेता तसे पत्रकदेखील वरिष्ठांना पाठवण्यात येईल.

–  पृथ्वीराज पाटील, कृषी अधिकारी, वसई