निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कळवा रुग्णालयास महिन्याची मुदत
ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये रात्री दहा वाजेपर्यंत शवविच्छेदन करण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सद्य:स्थितीत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतच शवविच्छेदन केले जात आहे. दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने एका महिन्याची मुदत मागितली आहे. त्यामुळे या मुदतीनंतर रात्री दहा वाजेपर्यंत मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाणार असल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना यापुढे शवविच्छेदन प्रक्रियेसाठी ताटकळावे लागणार नाही.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी शहरातील, जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातूनही अनेक रुग्ण येतात. याशिवाय, अपघातात जखमी झालेल्या रुग्णांनाही दाखल केले जाते. उपचारादरम्यान अनेकदा रुग्णांचा मृत्यू होतो. या मृतदेहांचे सकाळी नऊ ते सायंकाळी साडे पाच या वेळेत शवविच्छेदन करण्यात येते. मात्र, अनेकदा सायंकाळी उशिरा अपघातामध्ये एखादा रुग्ण दगावला तर त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन दुसऱ्या दिवशी सकाळी करण्यात येते. यामुळे मृताच्या नातेवाईकांना रुग्णालयामध्ये ताटकळत राहावे लागत होते. काहीवेळेस नातेवाईक अंत्यविधीसाठी मृतदेह गावी घेऊन जातात, मात्र सायंकाळनंतर शवविच्छेदन प्रक्रिया बंद होत असल्यामुळे ते शक्य होत नाही, असे मुद्दे उपस्थित करत शिवसेनेचे नगरसेवक दशरथ पाटील यांनी शवविच्छेदन प्रक्रियेचा वेळ वाढविण्याची मागणी केली.
दरम्यान, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैदिक विभागामार्फत मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येत असून हे काम तेथील चार डॉक्टरांमार्फतच होते. याशिवाय, या विभागातील कर्मचारी निवृत्त झाले असून त्यांच्या रिक्त जागेवर काम करण्यास कोणीही तयार होत नाही. त्यामुळे रुग्णालयातील अन्य तीन कर्मचारी शवविच्छेदनाच्या कामासाठी डॉक्टरांना मदत करतात. तसेच सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत वेळ असली तरी अनेकदा सात वाजेपर्यंतही शवविच्छेदन करण्यात येते, असे स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आले. तसेच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे तूर्तास रात्री दहा वाजेपर्यंत शवविच्छेदन करणे शक्य नसल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे सभापती संजय वाघुले यांनी रुग्णालय प्रशासनाला एका महिन्याची मुदत दिली.

डॉक्टर इच्छुक पण..
कळवा रुग्णालयामध्ये पंधरा वर्षांपूर्वी डॉ. सचिन धारणे हे काम करीत होते आणि त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले. सध्या मुंबई-ठाणे परिसरात एमआरसीपीसीएच ही पदवी असलेले तीन ते चार डॉक्टर असून त्यामध्ये डॉ. सचिन यांचा समावेश आहे. मुंबई तसेच ठाण्यातील मोठी खासगी रुग्णालये त्यांना कामावर नियुक्त करण्यास तयार आहेत, मात्र त्यांना कळवा रुग्णालयातच काम करायचे असून तिथे गरीब रुग्णांची सेवा करायची आहे. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे अर्जही केला आहे. परंतु, रुग्णालय प्रशासनाकडून त्यांच्या अर्जावर कोणताच विचार केला जात नाही, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विलास सामंत यांनी स्थायी समितीच्या सभेत केला. दरम्यान, याप्रकरणी पुढील सभेमध्ये यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती संजय वाघुले यांनी प्रशासनाला दिले आहेत.

अतिदक्षता विभागामध्ये श्वानांचा सुळसुळाट
कळवा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये कुत्रे बसलेले असतात, असा आरोप करत राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास देसाई यांनी कळवा रुग्णालयातील समस्यांचा पाढा वाचला. कळवा रुग्णालयावर वचक राहिलेला नसल्यामुळे ही परिस्थिती असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच ठाणे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर. टी. केंद्रे आहेत, मात्र त्यांच्याकडे कळवा रुग्णालयाची जबाबदारी नाही, असा मुद्दा उपस्थित करत त्यांनी केंद्रेंची जबाबदारी काढण्यामागचे स्पष्टीकरण मागितले. मात्र, त्याबाबत माहिती घेऊन पुढील सभेत उत्तर देऊ, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.