भाजपला सर्वाधिक फटका

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेतून वगळून नव्याने १८ गावांची स्वतंत्र कल्याण नगर परिषद स्थापन करण्याची प्रक्रिया शासनस्तरावर सुरू असून ही प्रक्रिया विनाअडथळा पूर्ण करण्यासाठी १८ गावचे पालिकेत प्रतिनिधित्व करणाऱ्या १३ नगरसेवकांचे पद प्रशासनाने गुरुवारी रद्द केले. पालिकेतील निवडणूक विभागाच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयाचा भाजपला सर्वाधिक फटका बसला असून या पक्षाच्या आठ नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे.

नगरसेवक पद रद्द झालेल्या नगरसेवकांनी पालिकेच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरू केली असल्याचे सूत्रांकडून समजते. तसेच आमदार गणपत गायकवाड यांनी पद रद्द करण्याच्या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण-डोंबिवली पालिकेतून १८ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय मार्चमधील विधिमंडळ अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारकडून घेण्यात आला. दीड महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र नगर परिषद करण्याच्या पार्श्वभूमीवर १८ गावच्या ग्रामस्थांकडून हरकती-सूचना मागविल्या आहेत. संघर्ष समितीच्या माध्यमातून सुमारे नऊ हजार सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाल्या आहेत. स्वतंत्र नगर परिषदेला विरोध करणारी आणि ही गावे पालिकेत ठेवण्याची मागणी करणारी याचिका वास्तुविशारद संदीप पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

या प्रकरणात कल्याण-डोंबिवली पालिकेसह सर्व प्रशासकीय यंत्रणांना सत्य प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

नगर परिषद स्थापनेची प्रक्रिया सुरू असताना पालिकेच्या निवडणूक विभागाने आयुक्तांना १८ गावे पालिकेतून वगळली असल्याने तेथील नगरसेवकांसंदर्भात निर्णय घेण्याचा अहवाल सादर केला होता. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नव्याने स्थापन होणाऱ्या १८ गाव नगर परिषद हद्दीतील १३ नगरसेवकांचे पद रद्द करण्याच्या निवडणूक विभागाच्या अहवालाला मंजुरी दिली. २७ गाव हद्दीत पालिकेचे एकूण २१ प्रभाग आहेत. १८ गाव वगळून उर्वरित नऊ गावे पालिका हद्दीत कायम ठेवल्याने येथील आठ नगरसेवकांना अभय मिळाले आहे.

पद रद्द झालेले नगरसेवक

मोरेश्वर भोईर(भाजप), रमाकांत पाटील(भाजप), जालिंदर पाटील(भाजप), इंदिरा तरे(भाजप), सुनीता खंडागळे(भाजप), कुणाल पाटील(अपक्ष-भाजप समर्थक), दमयंती वझे(अपक्ष-भाजप समर्थक), शैलजा भोईर(अपक्ष-भाजप समर्थक). सोनी अहिरे (बसप-सेना समर्थक), ऊर्मिला गोसावी(शिवसेना), प्रमिला पाटील(शिवसेना), विमल भोईर(शिवसेना), प्रभाकर जाधव(अपक्ष-मनसे समर्थक) यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे.

१८ गावे पालिकेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नऊ गावांसह शहरी पट्टय़ातील प्रभागांची नव्याने रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. प्रस्तावित स्वतंत्र नगर परिषद हद्दीतील कल्याण -डोंबिवली पालिकेत प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक आपल्या मतदार यादीतील नगरसेवक राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना आयोगाच्या नियमाप्रमाणे प्रशासनाने अनर्ह ठरविले आहे.

-संजय जाधव,  सचिव,  कडोंमपा