कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, पडघा परिसराला फटका

कल्याण : कल्याण, भिवंडी परिसरातील टपाल कार्यालयांमधील भारत संचार निगमची इंटरनेट सुविधा मागील तीन दिवसांपासून बंद असल्याने या कार्यालयांमधील ग्राहक सेवा ठप्प आहे. टपाल कार्यालयांचा सर्व कारभार ऑनलाइन पद्धतीने होतो. इंटरनेट सेवा नसल्याने कामकाज बंद असल्याने कर्मचाऱ्यांना काही कामे हस्तलिखिताने करावी लागत आहेत.

मनी ऑर्डर, मासिक व्याज योजना, किसान विकासपत्र व इतर सुविधांचा लाभ घेण्यासाठी बँकेनंतर टपाल कार्यालयात लोक गर्दी करतात. ज्येष्ठ नागरिक ग्राहकांची टपाल कार्यालयात वर्दळ असते. करोना काळात ग्राहक वर्ग सर्व प्रकारचे नियम पाळून टपाल कार्यालयात येतो. संगणक प्रणाली बंद असल्याचे कारण मागील शुक्रवारपासून ग्राहकांना देण्यात येते. काही कामे कर्मचारी हस्तलिखित पद्धतीने करत आहेत. त्याला खूप उशीर लागतो. त्यामुळे टपाल कार्यालयाबाहेर रांगा लागल्याचे दृश्य अनेक टपाल कार्यालयांसमोर दिसत आहे. यामध्ये कल्याण मधील शहाड, काटेमानिवली, टिटवाळा, गणेशवाडी, मोहने, सुभाष रस्ता, भिवंडीजवळील पडघा, अंबरनाथ टपाल कार्यालयांचा समावेश आहे. कल्याणमध्ये रेल्वे स्थानकाजवळील टपाल कार्यालयात ग्राहक सेवा दिली जाते. टपाल कार्यालयातील अधिकारी भारत संचार निगमच्या कल्याणमधील कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. तेथे उत्तर देण्यासाठी कोणी उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.

अधिक माहितीसाठी निगमच्या कल्याण कार्यालयातील महाव्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तो होऊ शकला नाही. तेथील उपस्थित अधिकाऱ्याने सांगितले, अशाप्रकारे निगमची इंटरनेट सेवा बंद असल्याची आपणास माहिती नाही. ज्या विभागातील टपाल कार्यालये बंद आहेत तेथे निगमद्वारे इंटरनेट सुविधा पुरविण्यात आली आहे. त्या विभागातील अधीक्षक अभियंत्यांना तातडीने त्या टपाल कार्यालयांमधील इंटरनेट सुविधेमध्ये काय अडचणी आहेत ते सोडविण्याचे आदेश देण्यात येत आहेत.