पूररेषेत असल्याने बदलापूर नगरपालिकेचा निर्णय

बदलापूर : पश्चिमेतील पूररेषेत मोडणाऱ्या गौरी सभागृहामधील कोविड रुग्णालयातील रुग्णांना शहरातील इतर खासगी रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यासाठी कुळगाव-बदलापूर नगरपालिका प्रशासनाने बुधवारी हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु पावसाने घेतलेली विश्रांती तसेच नातेवाईकांचा विरोध पाहून पालिकेने रुग्णांना हलवण्याचा निर्णय मागे घेतला आहे. सध्या गौरी सभागृहातच रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. रुग्णसंख्या घटल्याने येथील अतिदक्षता विभागातील रुग्णांची संख्या ३८ वर आली आहे.

बदलापूर पश्चिम भागातील मोठा परिसर पूररेषेत मोडतो. गेल्या वर्षी जलसंपदा विभागाने पूररेषा जाहीर केली होती. गेल्या वर्षी करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेने बदलापूर पश्चिमेतील नदीकिनारी असलेल्या गौरी सभागृहात २५० खाटांचे रुग्णालय सुरू केले होते. ऑगस्ट महिन्यात सुरू झालेल्या या रुग्णालयामध्ये ऑक्टोबर महिन्यात अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला. त्यामुळे शहरातील गंभीर रुग्णांवर शहरातच मोफत उपचार करण्याची सुविधा उपलब्ध झाली. मे महिन्याच्या अखेरीस शहरातील रुग्णसंख्या घटल्याने पालिकेने १२३ आरोग्य कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. त्यानंतर गौरी सभागृहातील रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी अतिदक्षता विभाग पालिकेकडे हस्तांतरित करावा असे आदेश पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेला पत्र लिहून दिले आहे. या संस्थेचा करार २६ जून रोजी संपुष्टात येणार होता. मात्र तो १० जून रोजी संपुष्टात आणण्यात आला आहे.

बारा जूनपर्यंत अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली असून हे रुग्णालय पूररेषेच्या भागात येते. त्यामुळे या भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने व्यवस्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुधवारी येथील रुग्णांना शहरातील इतर खासगी कोविड रुग्णालयांमध्ये हलविण्यात येणार होते. त्यास रुग्णांच्या नातेवाईकांनी विरोध केला. अतिदक्षता विभागातील रुग्णांचे नातेवाईक गौरी सभागृहाच्या आवारात बुधवारी जमले होते. रुग्णांच्या स्थलांतरणावेळी काही बरे वाईट झाले तर त्याची जबाबदारी कुणाची असेल, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या विरोधामुळे अखेर पालिका प्रशासनाने रुग्णांना येथून हलवण्याचा निर्णय मागे घेतला.

गौरी सभागृहात सध्या ३८ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील आठ जीवरक्षक प्रणालीवर आहेत. अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने रुग्णांना हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पावसाने घेतलेली विश्रांती आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या मागणीनंतर रुग्ण तेथेच ठेवण्याचे ठरवले. या रुग्णांसाठी शहरात इतरत्र पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून गरज पडल्यास कोणत्याही क्षणी रुग्ण हलवण्याची पालिकेची तयारी आहे.

– दीपक पुजारी, मुख्याधिकारी, कुळगाव-बदलापूर नगरपालिका