News Flash

दोन बळींनंतरही भिवंडी खड्डय़ांत

महापालिकेने आता बांधकामांतून निघणाऱ्या राडारोडय़ाच्या मदतीने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.

पालिकेकडून आणखी सात दिवसांचा हवाला

रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होऊन दोन जणांचे बळी गेल्यानंतर भिवंडी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे शहाणपण भिवंडी महापालिकेला सुचलेले नाही. अपघातांच्या या दुर्दैवी घटनांनंतर टीकेपासून वाचण्यासाठी पालिकेने दगड-मातीचा भराव टाकून खड्डे बुजवण्याची कारवाई सुरू केली असली तरी पावसाच्या पाण्यासोबत ही माती वाहून खड्डे पुन्हा उघडे पडत आहेत. एवढेच नव्हे तर, मातीच्या चिखलावरून घसरून अपघात होण्याच्या घटना आता समोर येत आहेत. त्यामुळे भिवंडीच्या रस्त्यांवरून वाहने चालवताना चालकांना अजूनही कसरत करावी लागत आहे.

महापालिकेने आता बांधकामांतून निघणाऱ्या राडारोडय़ाच्या मदतीने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. तसेच खड्डे बुजवण्यासाठी आठवडाभरात निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे, भिवंडी पोलिसांनी खड्डय़ांमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत अशा खड्डय़ांना जबाबदार असणाऱ्या महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.

भिवंडीतील बहुतेक सर्वच रस्त्यांची चाळण झाली आहे. महापालिका मुख्यालयासमोरील चौकात आणि जकात नाका-शांतीनगर मार्गावर भले मोठे खड्डे पडले आहेत. याशिवाय धामणकर नाका, शांती नगर, नायगाव, गुलजार नगर, गायत्री नगर या परिसरांतील रस्त्यांवर इतके खड्डे आहेत, की येथून पादचाऱ्यांनाही चालणे कठीण झाले आहे. शहरातील उड्डाणपुलांचीही तशीच अवस्था आहे. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉकच्या साह्य़ाने रस्ते बनवण्यात आले असून पेव्हर ब्लॉक उखडल्याने वा त्याखालील माती वाहून गेल्याने

या रस्त्यांची अवस्थाही बिकट झाली आहे.

दरम्यान, खड्डे बुजवण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. ‘‘मान्सूनपूर्व कामांमध्ये शहरातील रस्तेदुरुस्तीची कामे होती आणि त्यासाठी तीनदा निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र, त्यास ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यासाठी महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे कारण ठेकेदारांनी पुढे केले होते. या पाश्र्वभूमीवर मध्यंतरी ठेकेदारांची बैठक घेऊन त्यांना कामाची बिले मिळण्याची खात्री देण्यात आली होती. त्यामुळे या कामासाठी पुन्हा निविदा मागविल्या असून त्या आठवडाभरात उघडण्यात येतील. त्यानंतर शहरात खड्डे बुजविण्याची कामे सुरू होतील. असे असले तरी बांधकामाच्या ठिकाणाहून निघणाऱ्या रॅबिटच्या साहाय्याने शहरातील खड्डे बुजविण्याची कामे सुरू आहेत,’’ अशी माहिती महापालिकेचे शहर अभियंता एस.आर. निकम यांनी दिली.

अपघाताच्या घटना..

  • ५ जुलैला भिवंडी येथील मुंबई-नाशिक महामार्गावर खड्डा चुकविताना झालेल्या अपघातात दुचाकीस्वार रश्मी पावनदास रोहेरा (२०) या तरुणीचा मृत्यू झाला होता, तर तिच्या दोन मैत्रिणी जखमी झाल्या होत्या.
  • २ ऑगस्टला भिवंडीतील साईबाबा मंदिर रस्त्यावर खड्डय़ांमुळे झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या धीरज जामकर या दहावीतील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

अधिकाऱ्यांवर गुन्हे?

भिवंडी शहरात गेल्या महिनाभरात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दुचाकीवरील दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  या पाश्र्वभूमीवर पोलिसांनी आता अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची तयारी केली आहे. भिवंडी पश्चिम विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नरेश मेघराजानी यांनी खड्डय़ांमुळे अपघातांत वाढ झाल्याचे मान्य केले. यासंदर्भात महापालिका आयुक्तांना पत्र पाठवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. ‘ अपघात खड्डय़ांमुळे झाला आहे का, याची तपासणी वाहतूक तज्ज्ञ किंवा शहर अभियंतामार्फत करून त्याचा अहवाल देण्याची मागणीही करण्यात येणार आहे. यामध्ये खड्डय़ामुळे अपघात झाल्याचे आढळून आले तर  जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल,’ असे ते म्हणाले.

रिक्षातून खड्डय़ांची सफर

साहेब.. रस्त्यावरील खड्डय़ांमुळे रिक्षाचालक, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना काय त्रास सहन करावा लागतो, हे विचारण्यापेक्षा रिक्षात बसा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या, असे सांगत ए.आर. शेख या चालकाने त्याच्या रिक्षातून प्रस्तुत प्रतिनिधीला पालिका मुख्यालयासमोरील जकात नाका, शांती नगर, गायत्री नगर आणि एस.टी. डेपो रस्त्यावरील खड्डय़ांची सफर घडवली. या मार्गावरून शहरातील बहुतेक महत्त्वाच्या शाळांचे हजारो विद्यार्थी दररोज प्रवास करतात. अशा रस्त्यांवर वाहने चालवून त्यांच्या देखभालीचा खर्च वाढतोच, शिवाय वाहनचालकांचे आरोग्यही धोक्यात येते. वाहनचालकांना कंबरदुखीच्या तक्रारी भेडसावतात, असेही त्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2017 1:49 am

Web Title: potholes death in bhiwandi potholes issue
Next Stories
1 हल्लाबोल आयुक्तांवर, निशाणा महापौरांवर
2 खाऊखुशाल : वेड लावणारी ‘येडय़ाची मिसळ’
3 बदलापुरातील आद्य साहित्यिकाच्या स्मृती जपणार
Just Now!
X