मुंबई, ठाणे तसेच नवी मुंबई प्रवासाकरिता हमरस्ता मानला जाणाऱ्या कल्याण-शिळ मार्गावरील लोढा जंक्शन पहिल्याच पावसात शरपंजरी पडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होऊ लागली आहे. पावसाच्या माऱ्यामुळे येथील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या खड्डय़ांतून वाहने संथगतीने पुढे सरकत असल्याने ऐन गर्दीच्या वेळेत, सकाळी-संध्याकाळी या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

कल्याण-शिळ मार्गावरील लोढा जंक्शन येथील चौकातील चारही रस्त्यांवर मोठे खड्डे तयार झाले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या तिन्ही शहरांकडे ये-जा करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा असल्याने येथे वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. मात्र, रस्त्यावरील खड्डय़ांमुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे ऐन सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत वाहतूक कोंडी होत आहे. पाऊस सुरू असताना तर या भागातील वाहतुकीचा वेग आणखी मंदावतो. खड्डय़ांसोबत रस्त्यांवर पाणी साचल्याने दोन दिवसांपूर्वी येथील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित कल्याण-शिळ रस्ता येत असून या रस्त्यावरील शिळ फाटय़ाकडे जाणाऱ्या वाहिनीवर मोठे खड्डे पडले आहेत. मान्सूनपूर्व काळात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येतात. मात्र या मार्गावरील खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. या खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली असून त्यासंदर्भात नागरिकांकडून वाहतूक पोलिसांकडे तक्रारी येऊ लागल्या आहेत.

या संदर्भात ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांच्याशी संपर्क साधला असता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे बोट दाखवले. ‘यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पत्रव्यवहार केला आहे. या विभागाकडून या मार्गावरील खड्डे लवकर बुजविण्यात येतील, अशी अपेक्षा आहे. तोपर्यंत वाहतूक कोंडी कायम राहील,’ असे त्या म्हणाल्या.