६७५ खड्डे बुजवल्याचा पालिकेचा दावा

मुसळधार पावसाच्या माऱ्यांमुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याने टीकेचे धनी ठरलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांची पाहणी करत खड्डय़ांचे नुकतेच सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांवर एकूण ८८८ खड्डे पडले असून त्यामध्ये सर्वाधिक खड्डे मानपाडा, वर्तकनगर तसेच वागळे भागात आहेत. त्यापैकी ६७४ खड्डे बुधवापर्यंत जेट पॅचर या अत्याधुनिक यंत्राद्वारे बुजविण्यात आले आहेत, तर उर्वरित २३४ खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे.

एकीकडे यंदाच्या वर्षांत शहरातील वेगवेगळ्या भागांतील रस्त्यांच्या रुंदीकरण तसेच नूतनीकरणासाठी कोटय़वधी रुपयांचा खर्च करण्यात आला असतानाच दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याचे चित्र होते. या खड्डय़ांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डय़ांमुळे महापालिका प्रशासनावर टीका होऊ लागली होती. या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय रस्त्यांवरील खड्डय़ांचे सर्वेक्षण नुकतेच केले असून या सर्वेक्षणानुसार शहरामध्ये ८८८ खड्डे असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये सर्वाधिक खड्डे वागळे प्रभाग समिती क्षेत्रात असून या भागात २६४ खड्डे असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ माजिवाडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात १९१ तर वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात १०१ खड्डे आहेत. या तिन्ही प्रभाग समित्यांच्या तुलनेत अन्य प्रभाग समिती क्षेत्रात खड्डय़ांचे प्रमाण कमी असून सर्वात कमी खड्डे कोपरी आणि रायलादेवी प्रभाग समिती क्षेत्रात आहेत. कोपरी भागात ११ तर रायलादेवी भागात २३ खड्डय़ांची नोंद आहे, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

potholes-chart