19 October 2019

News Flash

चंद्राहूनही खडबडीत..!

ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच शहरांतील रस्ते खड्डय़ांत

ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच शहरांतील रस्ते खड्डय़ांत; वाहतूक संथगतीने, अपघातांचा धोका

ठाणे : एकीकडे चंद्रावर स्वारी करून भारत अंतराळक्षेत्रात प्रगत प्रवास करत असताना, ठाणे जिल्ह्य़ातील रस्त्यांवरून प्रवास करणे सध्या कठीण बनले आहे. ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी अशा सर्वच शहरांतील रस्त्यांची खड्डय़ांमुळे पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. आता नवीन खड्डय़ांनाही जागा उरली नसलेल्या रस्त्यांतून वाट काढताना संथगती होणाऱ्या वाहतुकीमुळे होणारा विलंब आणि फूटभर खोल खड्डय़ांमुळे वाढलेला अपघातांचा धोका अशा दुहेरी कात्रीतून सध्या नागरिकांचा प्रवास सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर कलाकार मंडळींनीही आता समाजमाध्यमांवरून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

खड्डे पडलेले रस्ते..

लोकमान्यनगर ते इंदिरानगर रस्ता, रस्ता क्रमांक १६ आणि २२, मुलुंड चेकनाका परिसरातील लालबहाद्दूर शास्त्री मार्ग, स्थानकाच्या दिशेने जाणारा गोखले रस्ता, रामचंद्रनगर रस्ता, ढोकाळी, कोलशेत रोड, आझादनगर, गोकुळनगर, माजीवडा चौक, दिवा-आगासन, घोडबंदर भागातील अंतर्गत रस्ते, सेवा रस्ते तसेच अल्मेडा, नौपाडा आणि मीनाताई ठाकरे चौक या तीन उड्डाणपुलांवरील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

ठाणे

मुंबई-नाशिक, मुंबई-अहमदाबाद या दोन्ही महामार्गावर खड्डे पडले असून या मार्गाच्या उड्डाणपुलांवर खड्डय़ांचे साम्राज्य असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित यंत्रणाकडून खडीचा तसेच पेव्हर ब्लॉकचा वापर करून खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र त्यानंतरही बुजविलेले खड्डे पुन्हा उखडल्याचे चित्र आहे. दुरुस्तीसाठी वापरण्यात आलेली खडी पावसाच्या पाण्यासोबत पुलांच्या पायथ्याशी वाहून आली असून त्यामुळे या ठिकाणी रस्ता उंच-सखल झाला आहे. या खडीवरून दुचाकी घसरून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंब्रा बाह्य़वळण मार्गावर मुंब्य्रातील भारत गिअर कंपनीपर्यंत खड्डे पडले आहेत.

महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचीही चाळण झाली आहे. शहरात ३१३७ खड्डय़ांची नोंद झाली असून त्यापैकी केवळ २२६ खड्डे बुजवणे शिल्लक असल्याचा दावा महापालिका करत आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता नेमके कोणते खड्डे बुजवले, असा प्रश्न पडू लागला आहे. ‘सिमेंट-काँक्रीट, कोल्ड मिक्स, जेट पॅचर यांच्या मदतीने खड्डे बुजवले जात आहेत,’ असा दावा पालिकेचे नगर अभियंता रवींद्र खडताळे यांनी केला. त्याच वेळी पावसामुळे पुन्हा खड्डे पडत असल्याची कबुलीही त्यांनी दिली. त्यामुळे रस्त्यांच्या निकृष्ट बांधकामावरही आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

कल्याण-डोंबिवली

खड्डय़ांच्या बाबतीत कल्याण, डोंबिवली या शहरांचा तर पहिला क्रमांक लागू शकेल. कल्याण पूर्वेतील काटेमानिवली, कोळसेवाडी, चिंचपाडा रस्ता, कल्याण मुरबाड रस्ता, ठाकुर्ली, चोळे, डोंबिवली पश्चिमेत गरिबाचापाडा, नवापाडा, सुभाष रस्ता, गुप्ते रस्ता, मानपाडा रस्ता, जिमखाना रस्ता, पत्रीपूल ते शिळफाटा रस्ता अशा सर्वच रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य दिसून येते. पाऊस थांबला की सर्वच रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल, असा दावा पालिका अधिकारी करत आहेत. मात्र तोपर्यंत नागरिकांना या खड्डय़ांतूनच प्रवास करावा लागणार आहे.  ‘शिळफाटा रस्त्याची खोली अधिक असल्याने ते जेसीबीच्या साहाय्याने काम करता येतात, पण पालिका हद्दीतील रस्त्यांची खोली तेवढी नसल्याने या ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करूनच खड्डे भरण्याची कामे करावी लागतात. त्यामुळे ही कामे करताना थोडे बंधन येते,’ असे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांनी सांगितले.

First Published on September 17, 2019 3:51 am

Web Title: potholes on all the cities of thane district zws 70