ठाण्यातील रस्त्यांवर अजूनही खड्डे;  अभियांत्रिकी विभागाचा सुस्त कारभार

गणेशोत्सवाच्या काळात संततधार पावसाचे कारण सांगून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास असमर्थता दाखवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाला पाऊस ओसरल्यानंतरही जाग आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरात रखरखीत ऊन पडले असतानाही रस्त्यांच्या डागडुजीची कामे अपूर्ण आहेत. ठाण्यातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांसोबतच महामार्गावरही खड्डे कायम असल्याचे दिसून येत आहे. आता नवरात्रोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाही खड्डे बुजवण्यात न आल्याने भाविकांना देवीची मिरवणूक खड्डय़ांनी व्यापलेल्या रस्त्यांतूनच काढावी लागेल, अशी परिस्थिती आहे.

furnaces of gold and silver factories
मुंबई : सोन्या-चांदीच्या कारखान्यांची भट्टी आणि धुरांडी हटवली, महापालिकेची गिरगाव, मुंबादेवीत कारवाई
PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
3 year old girl fall to death into a pothole on highway near titwala
टिटवाळ्याजवळ महामार्गाच्या खड्ड्यात पडून बालिकेचा मृत्यू

गणेशोत्सवाच्या तोंडावर ठाणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, असा दावा महापालिकेने केला होता. मात्र, त्या काळात पाऊस कायम राहिल्याने पालिकेला कामे न करण्यासाठी आयते कारण मिळाले. पावसाने पाठ फिरवल्यानंतर तरी, खड्डे बुजवण्याची कामे वेगाने पार पडतील, अशी अपेक्षा होती. त्या वेळी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीदेखील तशा सूचना दिल्या होत्या. मात्र, आयुक्तांच्या या आदेशाकडे पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने लक्ष दिल्याचे अद्याप दिसत नाही. काही रस्त्यांवर जेट पॅचर यंत्राच्या साह्याने खड्डे बुजवण्याचा देखावा निर्माण करण्यात येत आहे. मात्र, बहुतांश रस्त्यांची अवस्था आजही खराब आहे.

सेनेच्या उत्सवावर ‘कृपादृष्टी’

शिवसेनेच्या वतीने टेंभीनाका येथे नवरात्रोत्सवात साजरा करण्यात येतो. या ठिकाणी कळवा ते टेंभीनाका या मार्गावरील संपूर्ण रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. असे असले तरी हा न्याय शहरातील इतर भागांना मात्र लावण्यात आलेला नाही.

आयुक्तांचे मौनव्रत?

ठाणे महापालिकेच्या शहर अभियंता पदावरून रतन अवसोरमल हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून अवसोरमल ओळखले जात. त्यामुळे दर्जाहीन कामे आणि खड्डे बुजविण्यात अपयश येऊनही जयस्वाल यांनी नेहमीच अवसोरमल यांच्यावर कृपादृष्टी ठेवल्याची महापालिका वर्तुळात चर्चा होती. अवसोरमल यांच्याजागी आलेले अनिल पाटील हे नवे प्रभारी शहर अभियंता पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्या मर्जीतले मानले जातात. त्यामुळे जयस्वाल यांनी संपूर्ण ठाणे खड्डेमय होऊनही मौनव्रत धारण केल्याची उघड चर्चा येथील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या ठिकाणी ‘खड्डय़ांत रस्ते’

* घोडबंदर येथील माजिवडा येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तसेच नाशिकहून माजिवडा येथे येणाऱ्या मार्गावरही मोठमोठाले खड्डे पडले आहेत. तसेच या मार्गावरील अनेक ब्लॉकही उखडलेले आहेत.

* कोलशेतरोड – कोलशेत रोड येथे दोन्ही बाजूंना पडलेले खड्डे २० दिवसांपूर्वी बुजवण्यात आले होते. मात्र, ती तात्पुरती मलमपट्टी असल्याचे उघड झाले आहे. या मार्गावर अद्याप खड्डे कायम आहेत.

* चरई – चरई येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने येथील रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. त्यातच उरलेल्या रस्त्यावर खड्डे असल्याने वाहनचालकांची या ठिकाणी मोठी कसरत होते. तशीच अवस्था गोकुळ नगर भागातील रस्त्याची आहे.

* साकेत – साकेत मार्गावरही बाळकूम पाडा नंबर तीन येथून जाताना खड्डे पडलेले आहेत.