रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवर खड्डे

ठाणे शहरातील खड्डे बुजविण्यासाठी अमेरिकेतील तंत्रज्ञान आयात करण्याची भाषा एकीकडे महापालिकेमार्फत केली जात असली, तरी अतिशय गर्दीच्या अशा ठाणे स्थानकातील पोहच मार्गावर जागोजागी पडलेल्या खड्डय़ांमुळे ठाणेकरांची वाट कोंडीत सापडल्याचे चित्र दिसू लागले आहे.

रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी वेळोवेळी आदेश देऊन परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. पाऊस पुरेशा प्रमाणात विश्रांती घेत नसल्याने खड्डे बुजविणे कठीण जात असल्याचे कारण अभियंता विभागामार्फत दिले जात असले तरी किमान गर्दीच्या भागातील रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी ठोस उपाय आखावेत अशी मागणी होत आहे. शहरातील विविध भागातून सकाळ-सायंकाळी गर्दीच्या वेळेत मोठय़ा प्रमाणावर वाहनांची ठाणे स्थानकाच्या दिशेने ये-जा सुरू असते. रेल्वे स्थानकाजवळील मो.ह.विद्यालय, तलावपाळी, पूर्वेकडील बेडेकर महाविद्यालय परिसर, जिल्हा सामान्य रुग्णालय, गोखले रोड, बी-केबिन परिसरातील महत्त्वाचे रस्ते खड्डेमय झाल्याचे चित्र आहे. रेल्वे स्थानकालगत असलेले रस्ते खड्डेमय झाले असताना साकेत, बाळकूम भागातील खड्डे बुजविण्यातही महापालिकेस यश आलेले नाही. गोखले मार्गालगत  सरस्वती शाळेलगत असलेल्या रस्त्यांवरही खड्डे कायम आहेत.

सिग्नल बिघाडामुळे वाट अडली

ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे जागोजागी वाहन कोंडी होत असताना सोमवारी तलावपाळी येथील सिग्नल बंद पडल्याने या भागात वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्याचे दिसून आले. गर्दीच्या वेळी या भागात वाहतूक पोलीस तैनात केले जावेत अशी अपेक्षा असते. मात्र अशी कोणतीही व्यवस्था येथे नसल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसले. तलावपाळी सिग्नल ते जांभळी नाका तसेच गडकरी नाटय़गृह आणि स्थानक परिसरात ‘चक्का जाम’ झाल्याचे दिसून आले. कार्यालयात जाण्याच्या वेळेलाच हा गोंधळ उडाल्याने नोकरदार वर्गाला कोंडीत अडकावे लागले. हा सिग्नल बंद पडून या भागात नेहमी वाहतूक कोंडी होत असते, अशी माहिती येथून नियमित प्रवास करणारे रिक्षाचालक दयानंद पांडे यांनी दिली.