ठाणे : ठाण्यातील लोकमान्यनगर आणि यशोधननगरमधील महावितरणाच्या भूमिगत विद्युत वाहिन्यांमध्ये रविवारी रात्री ८ च्या सुमारास अचानक बिघाड झाल्याने दोन्ही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. हा बिघाड मोठा असल्याने या भागातील नागरिकांना रविवारची रात्र अंधारात काढावी लागली.

ठाण्यातील लोकमान्यनगर आणि यशोधननगर परिसरातील काही भागांमध्ये रविवारी रात्रीच्या वेळी महावितरणाच्या भूमिगत वाहिन्यांमध्ये बिघाड झाला. त्यामुळे या भागातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. हा बिघाड मोठा असल्याने सोमवारी सायंकाळपर्यंत हा बिघाड दुरुस्त झाला नव्हता. सध्या करोनाच्या काळात अनेक नागरिक हे घरातून काम करत आहेत. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांच्या शाळाही ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. मात्र, सोमवारी दिवसभर वीज नसल्यामुळे मोबाईल आणि लॅपटॉप यांसारखी उपकरणे चार्ज करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तर, अनेक घरातील इंटरनेट बंद झाले. त्यामुळे घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांंचे प्रचंड हाल झाले.  सायंकाळी उशिरापर्यंत महावितरणला हा बिघाड दुरुस्त करण्यात यश आले नव्हते. ‘भूमिगत विद्युत वाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे  वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. हा बिघाड मोठा असल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यास विलंब झाला,’ अशी माहिती महावितरण भांडुप परिमंडळाच्या जनसंपर्क अधिकारी ममता पांडेय यांनी दिली.