वाहतुकीची सोय नाही; वसईतील शेकडो नागरिकांची गैरसोय

वसई पश्चिमेच्या अंबाडी रोडवरील महावितरणाचे उपविभागीय कार्यालय हलवून थेट सनसिटीच्या निर्जनस्थळी हलवण्यात आले आहे. या ठिकाणी ना चांगला रस्ता आहे, ना वाहतुकीची कोणती सोय आहे. त्यामुळे शेकडो वीज ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे.

महावितरणाचे वसई शहरासाठी दोन उपविभाग आहेत. त्यांपैकी एक नालासोपाऱ्यात आणि दुसरा विरारमध्ये आहे. वसई पश्चिमेच्या अंबाडी रोड येथील हिरा निकेतन इमारतीत एक उपविभागीय कार्यालय आहे. या विभागाच्या अंतर्गत वसई गाव, वसई शहर पूर्व आणि पश्चिम आणि वाडा येथील कारभार चालतो. वसई विभागात अडीच लाख वीज ग्राहकांचा समावेश होतो. गेल्या अनेक वर्षांपासून हिरा निकेतन इमारतीत हे उपविभागीय कार्यालय होते, परंतु आता ते तेथून हलवून वसई पश्चिमेच्या सनसिटी येथे हलवण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे.

मुळात सनसिटी हे ठिकाणी शहरापासून लांब निर्जन ठिकाणी आहे. तेथे रिक्षा जात नाही. स्पेशल रिक्षा करून जावे लागते. त्यासाठी एका फेरीसाठी ४० ते ५० रुपये खर्च होते. या नवीन कार्यालयात जाण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होतो, असे वसईतील वीज ग्राहक किशोर साटम यांनी सांगितले. हे कार्यालय ज्या ठिकाणी आहे तेथे जाण्यासाठी नीट रस्तापण नाही. अशा ठिकाणी वीज कार्यालय हलवून महावितरणाने ग्राहकांना त्रास देण्याचे ठरवले आहे का, असा सवाल त्यांनी केला.

महावितरणाने मात्र या नवीन कार्यालयाचे समर्थन केले आहे. अंबाडी रोड येथील हिरा निकेतन इमारतीत असलेले उपविभागीय कार्यालय हे भाडय़ाच्या जागेत होते. दरमहा एक लाख रुपये भाडे भरावे लागत होते. सनसिटी ही महावितरणाची जागा असल्याने दर महिन्याचे एक लाख रुपये वाचणार आहेत, असे महावितरणाचे अधीक्षक अभियंता अरुण पापडकर यांनी सांगितले. वीज ग्राहकांना प्रत्येक वेळी या नव्या कार्यालयात येण्याची गरज नाही. वसई पश्चिमेला पाच शाखा कार्यालये आहेत. त्या ठिकाणी वीज ग्राहकांची लहान कामे होतील, असा दावा त्यांनी केला.